Rajasthan Mosques Demolition : राजस्थानमधील पाकसीमेवरील १५ कि.मी.च्या परिघातील १२ बेकायदेशीर मशिदी उद्ध्वस्त

कारवाईच्या विरोधात राजस्थान उच्च न्यायालयात याचिका

पाडण्यात आलेल्या मशिदी

जयपूर (राजस्थान) – राजस्थानच्या भारत-पाकिस्तान सीमावर्ती भागातील  बेकायदेशीर मशिदी हटवण्याच्या प्रशासकीय कारवाईवरून वाद झाला आहे. बाडमेर, बिकानेरसह अनेक सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये स्थानिक मुसलमानांनी या कारवाईच्या विरोधात निदर्शने केली. त्यांनी प्रशासनाला निवेदन देतांना आरोप केला की, मशिदी हटवण्यापूर्वी पीडित घटकांना पुरेशी संधी दिली गेली नाही आणि प्रक्रियेचे योग्य पालन केले गेले नाही. या कारवाईवर पुनर्विचार करावी, अशी मागणी केली.

या प्रकरणाविषयी राजस्थान उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेत दावा करण्यात आला आहे की, १८ ते २० जून या काळात आंतरराष्ट्रीय सीमेपासून १५ किलोमीटरच्या परिघात असलेल्या वेगवेगळ्या गावांमध्ये सुमारे १२ मशिदी उद्ध्वस्त करण्यात आल्या. ही कारवाई नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरोधात आहे आणि पीडित लोकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही.

प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेले आहे ! – राज्यशासन

राज्यशासनाच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले आहे की, हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या संवेदनशील भागांमध्ये कोणत्याही प्रकारच्या कायमस्वरूपी बांधकामासाठी विहित नियमांनुसार पूर्वअनुमती आवश्यक असते, अशी सरकारची भूमिका आहे. याच आधारावर संबंधित कारवाई करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

बेकायदेशीर मशिदी बांधल्या जात असतांना प्रशासन काय करत होते ? केवळ मशिदी पाडून प्रशासन थांबणार आहे कि संबंधितांना कारागृहातही डांबण्यासाठी प्रयत्न करणार आहे ?