महामार्गांवरील फलकांवरून ‘औरंगाबाद’, ‘अहमदनगर’ ही परकीय नावे हटवून ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘अहिल्यानगर’ लिहा !

  • सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे आदेश

  • हिंदु जनजागृती समितीकडून निवेदनाद्वारे पाठपुरावा

मुंबई – राज्यशासनाने आपला गौरवशाली इतिहास जपण्यासाठी अनेक शहरांची परकीय आणि जुनी नावे पालटून त्यांना नवीन अधिकृत नावे दिली आहेत. यामध्ये ‘औरंगाबाद’चे ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘अहमदनगर’चे ‘अहिल्यानगर’, ‘उस्मानाबाद’चे ‘धाराशिव’, तसेच ‘इस्लामपूर’चे ‘ईश्वरपूर’ आणि ‘वेल्हे’चे ‘राजगड’ असे नामकरण करण्यात आले आहे; मात्र महामार्गांवरील दिशादर्शक फलकांवर अद्यापही जुनी आणि परकीय नावे सर्रास झळकत आहेत. जुनी नावे तत्काळ हटवून त्याजागी शासनाने संमत केलेली नवीन नावे लिहावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. याची गंभीर नोंद घेत मंत्री महोदयांनी ‘ही नावे पालटली पाहिजेत, यामध्ये तातडीने कारवाई झाली पाहिजे’, असे सांगितले. यासंदर्भात ‘सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना आदेश देऊन लगेच कारवाई करण्यासाठी सांगतो’, असे आश्वासनही त्यांनी दिले. निवेदन देतांना समितीचे मुंबई येथील श्री. सतीश सोनार, श्री. अरविंद पानसरे आणि श्री. रवींद्र नलावडे प्रामुख्याने उपस्थित होते, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली आहे.

अशा प्रकारचे आदेश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्रीश्री. इंद्रनील नाईक यांनीही दिले आहेत. राज्यशासनाने रीतसर शासन निर्णय आणि राजपत्र प्रसिद्ध करून या नवीन नावांना कायदेशीर मान्यता दिलेली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,

१. एकदा राजपत्र काढून नावात पालट केल्यानंतर सर्व शासकीय दप्तरी आणि सार्वजनिक फलकांवर नवीन नावांचा वापर करणे प्रशासनाला कायदेशीररित्या बंधनकारक असते. असे असतांनाही जुन्या नावांचे फलक तसेच ठेवणे, हा अधिकृत शासकीय निर्णयाचा प्रशासकीय अवमान आहे.

२. मार्गदर्शक तत्त्वे आणि बांधकाम विभागाची कार्यपद्धत यांनुसार दिशादर्शक फलक अद्ययावत् नसणे ही प्रवाशांची दिशाभूल असून राजपत्रित आदेशाचे पालन न करणे, ही संबंधित अधिकार्‍यांची थेट दायित्वशून्यता ठरते.

३. दिशादर्शक फलकांवरील नावांचा विषय केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते विकास महामंडळ यांनी जुने फलक हटवून नवीन नावे अद्ययावत करण्यासाठी तात्काळ परिपत्रक काढावे.