‘तीन तलाक’च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण खपवून घेतले जाणार नाही ! – Allahabad High Court

(तीन तलाक म्हणजे मुसलमान पुरुषाने एकाच वेळी तीन वेळा ‘तलाक’ असे म्हणून पत्नीला दिलेला घटस्फोट. ही प्रथा वर्ष २०१९ मध्ये भारतात अवैध घोषित करण्यात आली आहे.)

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने तीन तलाक  आणि ‘निकाह हलाला’ (हलाला म्हणजे पहिल्या पतीने तलाक दिल्यावर परत त्याच्याशीच विवाह करायचा असेल, तर महिलेने अन्य कुणाशी तरी विवाह करून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवून नंतर त्याने तलाक दिल्यावर परत पहिल्या पतीशी विवाह करण्याची प्रथा) यांच्या माध्यमातून लैंगिक शोषण केल्याचा आरोप करणार्‍या एका महिलेच्या प्रकरणात ९ जणांविरुद्धचा गुन्हा रहित करण्यास नकार दिला आहे. ‘गुन्हेगारी कृत्यांचे संरक्षण करण्यासाठी वैयक्तिक (धार्मिक) कायद्यांचा आधार घेतला जाऊ शकत नाही’, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने महिलेचा माजी पती, मौलाना (धर्मगुरू), नातेवाईक आणि इतर आरोपींनी प्रविष्ट केलेल्या याचिका फेटाळून लावतांना हे निरीक्षण नोंदवले. हे प्रकरण उत्तरप्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील आहे. तेथे एका महिलेने अल्प वयातील लग्न, तलाक, निकाह हलाला आणि पुनर्विवाह यांच्या नावाखाली वारंवार लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला होता.

उच्च न्यायालयाने सांगितले की, या आरोपांवरून अत्यंत गंभीर स्वरूपाची तथ्ये समोर येत आहेत आणि ती प्रथमदर्शनी कायद्याच्या विरोधात असल्याचे दिसून येते. या प्रकरणात कथितपणे वापरल्या गेलेल्या प्रथा समाजाचे एक ‘काळे पान’ दर्शवतात आणि त्या घटनात्मक मूल्ये, समानता आणि मानवी प्रतिष्ठेशी सुसंगत नाहीत. हे कृत्य केवळ कायद्याच्या नावाखाली केलेला गुन्हाच नसून समाजाच्या सद्सद्विवेकबुद्धीला झटका देणारे आहे. गुन्हेगारी कृत्य लपवण्यासाठी वैयक्तिक कायद्यांचा ढाल म्हणून वापर करता येणार नाही.


काय आहे प्रकरण ?

तक्रारदार महिलेचे वय एप्रिल २०१५ मध्ये साधारण १५ वर्षे असतांना तिचे अझहर नवाज नावाच्या व्यक्तीशी बलपूर्वक लग्न लावून देण्यात आले होते. जानेवारी २०१६ मध्ये अझहरने कथितरित्या तीन तलाक दिल्यानंतर वर्ष २०१७ मध्ये अझहरशी पुन्हा लग्न करण्यापूर्वी तिला मौलाना कय्युमसमवेत ‘निकाह हलाला’ करण्यास भाग पाडले गेले. वर्ष २०२१ मध्ये पुन्हा घटस्फोट झाल्यानंतर अझहरने पुन्हा एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचा भाऊ शाहनवाज चौधरी आणि नातेवाईक हकीम निशात यांनी पीडितेला सांगितले की, तिचा दोनदा घटस्फोट झाला असल्याने अझहरशी पुन्हा लग्न करण्यापूर्वी तिला दोनदा निकाह हलाला प्रक्रियेतून जावे लागेल. या प्रथेच्या नावाखाली शाहनवाज आणि निशात यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये पीडितेवर बलात्कार केला आणि विरोध केल्यास तिला अन् तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली.


संपादकीय भूमिका

तीन तलाक कायद्याने गुन्हा असल्याने असा गुन्हा करणार्‍यांना कारागृहात टाकून त्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे !