आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदी नगरी सज्ज !

देहूतील पालखी सोहळा ७ जुलैला, तर आळंदीतील ८ जुलैला प्रस्थान ठेवणार !

देहू (जिल्हा पुणे) – आषाढी वारीसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा ७ जुलैला देहूतून, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा ८ जुलैला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यांसाठी देशभरातून येणार्‍या लाखो वारकरी भाविकांच्या सोयीसुविधांसाठी देहू आणि आळंदी नगर परिषदेने जय्यत सिद्धता केली आहे. वारी ‘निर्मल आणि हरित’ करण्याच्या अनुषंगाने देहूमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जात असून रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत.

भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाने पुढीलप्रमाणे महत्त्वाचे नियोजन केले आहे

१. वारीकाळात २४ घंटे पाणीपुरवठा केला जाईल. पिण्याच्या पाण्यासाठी एकूण ४० टँकर सज्ज असून, जिल्हा परिषदेद्वारे १ सहस्र २०० फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

२. पावसाची शक्यता लक्षात घेऊन परंडवाल चौकातील २ ठिकाणी एकूण ३० सहस्र स्क्वेअर फुटांचे जर्मन हँगर (तात्पुरते शेड) उभारण्यात येत आहेत. त्यामुळे वारकर्‍यांना निवारा मिळेल.

३. गर्दीच्या ठिकाणी ४० सीसीटीव्ही छायाचित्रक आणि १८ ठिकाणी मोठे दिवे बसवण्यात येणार आहेत.


पालखी सोहळ्यानिमित्त पालखी मार्गावरील वाहतुकीत मोठे पालट करण्यात आले असून ती पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत. ७ जुलैला देहूतून पालखीचे प्रस्थान होणार असून, ग्रामीण हद्दीत ११ ते १५ जुलै या काळात विशेष बंदोबस्त तैनात असेल.

नागरिकांच्या सुविधेसाठी प्रमुख पालट खालीलप्रमाणे आहेत !

  • १२ जुलै (लोणीकाळभोर ते यवत)- पुणे-सोलापूर बाजूची वाहतूक वाघोली-केसनंद-राहू-पारगाव-चौफुला मार्गे चालेल.
  • १३ जुलै (यवत ते वरवंड) – पुणे बाजूकडून जाणारी वाहने हडपसरवरून मगरपट्टा-लोणीकंद-न्हावरे-दौंड-कुरकुंभ मार्गे, तर सोलापूरकडून येणारी वाहने याच मार्गाने उलट दिशेने जातील.
  • १४ आणि १५ जुलै (वरवंड ते बारामती) – बारामती-पाटस आणि बारामती-दौंड रस्ते बंद रहातील. ही वाहतूक भिगवण िकंवा चौफुला-सुपा मार्गे वळवण्यात आली आहे.
  • १६ ते १८ जुलै (सणसर, निमगाव केतकी ते इंदापूर) – जंक्शन ते बारामती आणि निमगाव केतकी ते इंदापूर मार्ग बंद रहातील. वाहनांसाठी कळंब-बावडा-इंदापूर आणि भिगवण मार्गांचा पर्याय असेल.
  • १९ जुलै (इंदापूर ते सराटी) – इंदापूर शहरातील जुना पुणे-सोलापूर रोड बंद राहील आणि वाहतूक बायपासने वळवली जाईल. इंदापूर-अकलूज रस्ता पूर्णपणे बंद रहाणार असून, वाहनांना टेंभुर्णी-माळीनगर किंवा नातेपुते-जंक्शन मार्गाचा वापर करावा लागेल.

जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिक आणि वाहनचालक यांना या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.