पालखी सोहळा अथपासून इथपर्यंतचा प्रवास

महाराष्ट्रात ७ जुलैपासून ‘पालखी सोहळा’ चालू होत आहे. त्या निमित्ताने...

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा इतिहास हा केवळ धार्मिक परंपरेचा इतिहास नाही, तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक अन् लोकजीवनाची चालती-बोलती ऐतिहासिक नोंद आहे. आज लाखो वारकरी, शेकडो दिंड्या, डिजिटल नियंत्रण व्यवस्था, ड्रोनद्वारे निरीक्षण, प्रशस्त चौपदरी रस्ते आणि अत्याधुनिक सुविधा यांसह दिसणारा पालखी सोहळा एकेकाळी अत्यंत साध्या, कष्टमय अन् खडतर पायी यात्रेच्या स्वरूपात अस्तित्वात होता. चिखलातून, नदी-नाल्यांतून, डोंगर-दर्‍यांतून आणि काटेरी पायवाटांवरून विठ्ठलाच्या भेटीस निघालेल्या या यात्रेने काळानुसार आधुनिकतेचा स्वीकार केला; पण तिच्या भक्तीचा आत्मा मात्र आजही तितकाच जिवंत आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज

१. संतकालीन वारी : भक्ती, साधेपणा आणि सामूहिकता

संतांच्या काळात आजच्या अर्थाने पालखी सोहळा, अशी औपचारिक संकल्पना अस्तित्वात नव्हती. वारकरी टाळ-मृदंग, वीणा, भगवी पताका आणि संतांच्या पादुका यांच्यासह पायी पंढरपूरकडे प्रस्थान करत असत. गावोगावी मुक्काम, रात्री भजन-कीर्तन, पहाटे हरिनामाचा गजर आणि पुन्हा प्रवास एवढ्याच साधेपणात वारी पुढे जात होती. ना रथ, ना चोपदार, ना नियोजित मुक्काम, ना प्रशासकीय व्यवस्था. ‘विठ्ठलनाम हाच आधार आणि सामूहिक भक्ती’, हीच शक्ती होती.

संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे धाकटे चिरंजीव ह.भ.प. नारायण महाराज यांनी वारीची सूत्रे हाती घेतली. त्यांनी वारकर्‍यांचे संघटन करून वारीला अधिक नियमित आणि शिस्तबद्ध स्वरूप दिले. वारकरी परंपरेतील काही उल्लेखांनुसार प्रारंभी काही काळ दोन्ही संतपरंपरांमध्ये एकात्म भावाने वारी केली जात असे. त्यामुळे ‘ज्ञानोबा-तुकोबा’ हा संयुक्त गजर वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक एकात्मतेचे प्रतीक बनला.

२. खडतर मार्ग, पावसाळी वाटा आणि जीवघेणा प्रवास

आज जसे चौपदरी महामार्ग आणि प्रशस्त रस्ते आहेत, तसे त्या काळात नव्हते. पालखी मार्ग हा मुख्यतः मातीचे रस्ते, जंगलातील पायवाटा, नदीकाठचे मार्ग आणि व्यापारी घोडेमार्ग यांवर आधारित होता. पावसाळ्यात नद्या दुथडी भरून वहात आणि अनेकदा वारकर्‍यांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत असे. काही ठिकाणी होड्यांचा आधार घ्यावा लागे. दिवे घाट, जेजुरी परिसर आणि माळशिरसकडील अनेक टप्पे अत्यंत खडतर मानले जात; मात्र हे मार्ग आजसारखे निश्चित नव्हते. पावसाचा जोर, नदीची स्थिती आणि सुरक्षितता लक्षात घेऊन मार्गात पालट होत असत.

३. श्रीगुरु ह.भ.प. हैबतबाबा आरफळकर आणि पालखी सोहळ्याचे संघटन

पालखी सोहळ्याला संघटित, शिस्तबद्ध आणि सार्वजनिक स्वरूप देण्याचे मोठे श्रेय श्रीगुरु ह.भ.प. हैबतबाबा आरफळकर यांना जाते. ग्वाल्हेरकर शिंदे यांच्या सैन्यात सरदार म्हणून काम केल्याने लष्करी शिस्त त्यांच्या अंगी भिनली होती. त्यांनी तीच शिस्त वारीत उतरवली. रथ, दिंडी, चोपदार आणि मानव्यवस्था यांसह पालखी सोहळ्याची अधिक संघटित पुनर्रचना करण्यात आली. दिंड्यांना क्रमांक देण्यात आले. मुक्काम आणि प्रस्थान यांच्या वेळा निश्चित करण्यात आल्या. चोपदार, नगारखाना, अश्व, ध्वज आणि शामियाने यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे वारी एका साध्या भक्ती यात्रेतून शिस्तबद्ध लोकसोहळ्यात रूपांतरित झाली.

विविध सरदार, संस्थानिक आणि जहागीरदार यांनी धान्य, घोडे, तंबू अन् आर्थिक साहाय्य देण्यास प्रारंभ केला. आजही पालखीतील अनेक मानपरंपरा त्या इतिहासाच्या जिवंत साक्षी मानल्या जातात.

पालखी मार्गाचे चौपदरीकरण

४. महाराष्ट्र शासनाचा वाढता सहभाग, आधुनिक विकास आणि ऐतिहासिक वारसा यांचा संतुलित संगम

दीर्घकाळ वारीचे व्यवस्थापन हे स्थानिक गावकरी, मानकरी, दिंडीप्रमुख आणि वारकरी परंपरेची सामूहिक शिस्त यांवर आधारित होते. पूर्वीपासून काही प्रमाणात प्रशासकीय साहाय्य असले, तरी वर्ष १९९० च्या दशकानंतर शासनाचा सहभाग अधिक औपचारिक आणि व्यापक झाला. ‘निर्मल वारी’सारख्या स्वच्छता मोहिमा, आरोग्य सुविधा आणि वाहतूक नियंत्रण यांमधून शासनाची भूमिका अधिक स्पष्ट झाली. त्यानंतर पालखी मार्गांचा विकास, मूलभूत सुविधा, मुक्काम व्यवस्थापन आणि समन्वित नियोजन या कामांना अधिक गती मिळाली. आरोग्य विभागाच्या वतीने फिरते दवाखाने, रुग्णवाहिका, आरोग्यदूत आणि वैद्यकीय पथके तैनात करण्यात येऊ लागली. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी मोठा पोलीस बंदोबस्त उभा राहू लागला. अलीकडील काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालखी नियोजनासंदर्भात विशेष बैठका घेऊन प्रशासनाला आवश्यक सुविधा आणि समन्वय यांविषयी निर्देश दिले. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही पालखी व्यवस्थापनाच्या संदर्भात संयुक्त बैठका घेऊन विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यावर भर दिला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गाच्या विकासासाठी विशेष लक्ष दिल्यानंतर या ऐतिहासिक वारीला आधुनिक पायाभूत सुविधांची नवी जोड मिळाली.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि संत तुकाराम महाराज पालखी यांच्या मार्गांच्या चौपदरीकरणामुळे वारकर्‍यांचा प्रवास अधिक सुरक्षित अन् सुखकर झाला आहे. नव्याने विकसित करण्यात आलेल्या मार्गावर अनेक सुविधा उभारण्यात आल्या असून काही कामे अद्याप प्रगतीपथावर आहेत. विशेष म्हणजे या विकासकामांच्या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ऐतिहासिक विहीर, बाजीराव विहीर यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे आधुनिक विकास आणि ऐतिहासिक वारसा यांचा संतुलित संगम या मार्गावर पहायला मिळतो.

पारंपरिक खेळ

५. वारी : महाराष्ट्राच्या लोकमनाची जैविक परंपरा

वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी धार्मिक यात्रा नाही, तर ती महाराष्ट्राच्या लोकमनाची जैविक परंपरा आहे. यात समता, सेवा, श्रमसंस्कृती, लोकशाही आणि सामूहिकतेची अद्भुत शक्ती आहे. खडतर पायवाटांपासून आधुनिक राजमार्गापर्यंत आलेल्या या परंपरेने काळ, व्यवस्था आणि रस्ते पालटले; पण वारकर्‍यांच्या ओठांवरील ज्ञानोबा-तुकोबाचा गजर आजही तितक्याच श्रद्धेने आसमंतात घुमत आहे.

–  युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, पुणे