आषाढी वारीसाठी ५४ विशेष रेल्वेगाड्या !

सोलापूर – आषाढी एकादशी २५ जुलै या दिवशी असून सहस्रो वारकरी पंढरपुरात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून वारकर्‍यांच्या सोयीसाठी ५४ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. नागपूर-मिरज, अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, कोल्हापूर-कुर्डूवाडी तसेच पुणे-मिरज या मार्गांवर या गाड्या धावतील. नागपूर-मिरज, अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर आणि भुसावळ-पंढरपूर या मार्गांवर प्रत्येकी ४ फेर्‍या, लातूर-पंढरपूर मार्गावर ८ फेर्‍या, तर कोल्हापूर-कुर्डूवाडी आणि पुणे-मिरज मार्गांवर प्रतिदिन विशेष गाड्या धावतील. विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित शयनयान (स्लीपर) आणि सर्वसाधारण डब्यांची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील वारकर्‍यांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येईल. तिकीट संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर, तसेच ‘आय.आर्.सी.टी.सी.’च्या संकेतस्थळावर उपलब्ध असून अनारक्षित तिकिटांची सुविधा तिकीट खिडक्या आणि रेल्वे ॲपद्वारे मिळेल.