France Heatwave : फ्रान्समध्ये उष्णतेमुळे ४ दिवसांत १ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू

रस्ते वितळले, जंगलांना लागत आहे आग !

पॅरिस (फ्रान्स) – युरोपमध्ये सध्या उष्णतेची प्रचंड लाट आली आहे. केवळ फ्रान्समध्येच उष्णतेमुळे १ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू २४ जून ते २७ जून या ४ दिवसांत झाले आहेत, असे आरोग्य संस्थेने म्हटले असले, तरी सरकारने कोणताही आकडा दिलेला नाही. सरकारच्या मते मृतांमध्ये ८५ टकके वृद्ध आहेत. सर्वाधिक मृत्यू घरांमध्ये झाले. विशेषतः राजधानी पॅरिस आणि त्याच्या आसपासच्या परिसरात अशी प्रकरणे अधिक समोर आली. तापमानामुळे रस्त्यावरील डांबर वितळू लागले आहे, सिग्नल यंत्रणेवरील प्लास्टिक वितळले आहे. तसेच ट्राम गाड्यांचे रुळ उष्णतेमुळे वाकडे झाले आहेत. या स्थितीमुळे जंगलांमध्ये आग लागत आहे.

युरोपमधील जर्मनी, स्पेन, ब्रिटन, डेन्मार्क, इटली आणि स्वित्झर्लंडसह १६ देशांमध्ये तापमानाने दशकांपूर्वीचे विक्रम मोडले आहेत. २८ जून या दिवशी युरोपमधील अनुमाने १९ कोटी १० लाख लोकांना ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमानाचा सामना करावा लागला. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, युरोपचे तापमान जगाच्या सरासरी तापमानापेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. भविष्यात अशा उष्णतेच्या लाटा अधिक वेळा येतील आणि अधिक काळ टिकतील.

एसी खरेदी करण्यावर बंधने !

जीवघेण्या उष्णतेपासून वाचण्यासाठी युरोपमधील लोक सहजपणे वातानुकूलित यंत्र (एअर कंडिशनर – एसी) खरेदी करू शकत नाहीत. युरोपमध्ये कठोर सरकारी नियम, जाचक कायदे आणि गगनाला भिडलेल्या किमती, यांमुळे तेथे एसी खरेदी करणे एक चैनीची वस्तू बनली आहे. वर्ष २०२४ मध्ये आलेला युरोपीय संघाच्या सुधारित ‘एफ्-गॅस रेग्युलेशन’ कायद्यानुसार जागतिक तापमान वाढवणार्‍या वायूंवर मोठा कर आकारला जातो किंवा त्यांवर बंदी घातली जाते. युरोपीय संघाने वर्ष २०५० पर्यंत संबंधित वायू ९५ टक्क्यांपर्यंत अल्प करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या कारणामुळे बाजारात जुने आणि स्वस्त वातानुकूलित यंत्र मिळणे बंद झाले आहे. नवीन आणि पर्यावरणास अनुकूल असलेले वातानुकूलित यंत्र बाजारात येत आहेत; परंतु त्यांचा पुरवठा अल्प आणि मागणी अधिक असल्यामुळे त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. नियम केवळ वायूंपुरतेच मर्यादित नाहीत. लंडनसारख्या शहरांमध्ये जर घराबाहेर वातानुकूलित यंत्राचा ‘कॉम्प्रेसर’ किंवा ‘आऊटडोअर युनिट’ लावायचा असेल, तर तुम्हाला स्थानिक महानगरपालिकेची अनुमती घ्यावी लागू शकते. ऐतिहासिक इमारती किंवा संवर्धन क्षेत्रांमध्ये केवळ या कारणावरून अर्ज फेटाळला जातो की, बाहेर लावलेला एसी इमारतीचे सौंदर्य खराब करत आहे. याव्यतिरिक्त जर वातानुकूलित यंत्राच्या आवाजामुळे शेजार्‍यांना त्रास होत असेल, तर प्रशासन संबंधितांना तो हटवण्याचा किंवा आवाज अल्प करण्याचा आदेश देऊ शकते.

युरोपमध्ये नेहमीच हवामान अतिशय थंड असते. तेथील घरांचे बांधकाम  हिवाळ्यातील भीषण थंडीपासून वाचवण्याच्या दृष्टीकोनातून केलेले असते. घरांच्या भिंती जाड असतात आणि तिथे ‘सेंट्रलाइज्ड हीटिंग सिस्टम’ असते, जेणेकरून आत उष्णता टिकून राहील. जेव्हा तापमान २६ अंशांवर पोचते, तेव्हा तिथे ‘हीटवेव्ह’ (उष्णतेची लाट) घोषित केली जाते, तर दक्षिण आशियात हे अतिशय आल्हाददायक हवामान मानले जाते. युरोपमध्ये केवळ २० टक्के घरांमध्येच वातानुकूलित यंत्र बसवलेले आहे. तेतील लोक आतापर्यंत पंखे किंवा खिडक्या-दारांतून मिळणार्‍या नैसर्गिक हवेवर अवलंबून असायचे; परंतु हवामान पालटाने आता सर्व काही पालटून टाकले आहे.