न्यायालयाच्या सुट्ट्यांनंतर सुनावणी झाली, तर आभाळ कोसळणार नाही ! – Supreme Court

श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणातील याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वाेच्च न्यायालयाने नकार देत याचिकार्त्यांना फटकारले !

नवी देहली – श्रीराममंदिरातील दानाच्या चोरी प्रकरणावर एक जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती. या याचिकेत सीबीआयच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारले की, ‘जर उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर न्यायालयाचे नियमित कामकाज चालू झाल्यावर या प्रकरणाची सुनावणी झाली, तर आभाळ कोसळणार नाही. तुम्हाला घाई काय आहे ? प्रक्रियेनुसार सुनावणी घेतली जाईल. या याचिकेवर १२ ते १७ जुलैच्या आठवड्यात विचार केला जाईल’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्याची मागणी फेटाळून लावली.

ही याचिका २ अधिवक्त्यांच्या वतीने प्रविष्ट करण्यात आली होती. उत्तरप्रदेश पोलिसांकडून चालू असलेल्या अन्वेषणावर विश्वास ठेवता येत नाही; कारण महत्त्वाचे पुरावे नीट सुरक्षित ठेवले जात नाहीत, असे या याचिकेत म्हटले होते.