कचरा प्रक्रिया सक्तीविरोधात ‘हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ आक्रमक

‘ए आय’ निर्मित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या आधारे १०० किंवा त्यापेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण संस्थांना स्वतःच्या आवारात ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्याची सक्ती केली आहे. या जाचक परिपत्रकाला ‘चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ने तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात एक बैठक पार पडली. बैठकीत फेडरेशनने हा निर्णय अत्यंत अन्यायकारक आणि सोसायट्यांवर बळजोरीने लादलेला असल्याचे ठामपणे मांडत महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त जंगम, उपायुक्त (आरोग्य) ठेंगल आदींसह ‘पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ आणि ‘पुणे जिल्हा फेडरेशन’चे पदाधिकारी, तसेच विविध सोसायट्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जनतेला कचरा प्रक्रियेची सक्ती करण्यापूर्वी त्यांना त्यादृष्टीने सर्व सुविधा देण्याकडे प्रशासन का पहात नाही ? असे प्रशासन काय कामाचे ?  – संपादक)

महापालिकेने आधी संबंधित दोषी बांधकाम व्यावसायिकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांच्याकडून सोसायट्यांमध्ये आवश्यक सुविधा उभारून घ्याव्यात, त्यानंतरच सोसायट्यांवर कोणतेही दायित्व टाकावे, अशी आग्रही मागणी फेडरेशनने लावून धरली.

सोसायट्यांचा तीव्र विरोध आणि तांत्रिक अडचणी पहाता प्रशासनाने मवाळ भूमिका घेतली आहे. अतिरिक्त आयुक्त जंगम यांनी या सर्व सूत्रांचा सखोल आणि सकारात्मक विचार करून लवकरच तज्ञांच्या उपस्थितीत सोसायट्यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित केली जाईल, असे आश्वासन दिले; मात्र यावर फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी प्रशासनाला पुढील चेतावणी दिली आहे. ‘सर्व समस्यांवर ठोस तोडगा निघेपर्यंत महापालिकेने कोणतीही सक्ती करू नये. जर योग्य तोडगा न काढता महापालिकेने सोसायट्यांचा ओला कचरा उचलणे बंद केले, तर तोच ओला कचरा थेट आयुक्तांच्या दालनात टाकून तीव्र आंदोलन करण्यात येईल.’