कोल्हापूर आणि पुणे  येथे २ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा !

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला ३ सहस्र कोटी रुपये

इचलकरंजी येथील कार्यक्रमात उपस्थित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसेच अन्य

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – पश्चिम महाराष्ट्रातील सहकार आणि साखर उद्योगाला बळ देणारी महत्त्वपूर्ण घोषणा करत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी ३ सहस्र कोटी रुपयांच्या २ मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली. ‘कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे १ सहस्र ५०० कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प, तर पुणे येथील बंद पडलेले नॅशनल हेवी इंजिनीअरिंग को-ऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी १ सहस्र ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे’, असे त्यांनी सांगितले. इचलकरंजी येथील ‘कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्सटाईल पार्क’मध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, भाजपचे खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री राहुल आवाडे, शिवाजी पाटील, अशोक माने, रवींद्र चव्हाण आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर, महापौर उदय धातुंड यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

मंत्री अमित शहा पुढे म्हणाले, ‘‘सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर केंद्र सरकारने साखर उद्योगाला स्थैर्य देण्यासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. साखर कारखान्यांवरील अनुमाने ४६ सहस्र कोटी रुपयांचा प्राप्तीकर माफ करण्यात आला असून राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या वतीने १० सहस्र कोटी रुपयांहून अधिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवणे आणि इथेनॉलवरील मूल्यवर्धित कर २८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत अल्प करणे यांसारख्या निर्णयांमुळे साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळाली आहे. सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या उपउत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे १ सहस्र ५०० कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून मिळणारा सर्व नफा पुन्हा सहभागी साखर कारखान्यांना वितरित केला जाणार असल्याने शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होणार आहे.’’

इचलकरंजीला जुने दानवाड योजनेतून पाणीपुरवठा करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘इचलकरंजी शहरासाठी वर्ष २०५१ पर्यंत पिण्याचे पाणी शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड येथून उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यासाठी आवश्यक निधी राज्यशासन देईल. ‘पॉवरलूम’ (हातमाग) उद्योगासाठी ‘सोलर पार्क’ (सौर उद्यान) उभारून स्वस्त आणि स्वच्छ वीज उपलब्ध करून देण्यात येईल.’’