पुणे येथे महसूल निरीक्षकाला दाऊद इब्राहिमच्या नावाने जिवे मारण्याची धमकी !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – येथे तस्करीच्या विरोधातील कारवाईनंतर ‘डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स’च्या (महसूल गुप्तचर संचालनालय) एका वरिष्ठ अधिकार्‍याला दाऊद इब्राहिम आणि ‘डी-कंपनी सिंडिकेट’चे नाव घेत मुश्ताक शेख नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुश्ताक शेख आणि अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तक्रारदार सुट्टीसाठी आपल्या गावी गेले असतांना मुश्ताक शेख याने त्यांच्याशी संपर्क साधला. त्याने स्वतःला माहिती पुरवणारा व्यक्ती असल्याचे सांगून अधिकार्‍यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने पुन्हा दूरभाष करून मुंबई विमानतळावर जप्त केलेले, दुबईहून भारतात आलेल्या काही व्यक्तींकडील भ्रमणसंगणक (लॅपटॉप) आणि भ्रमणभाष सोडवून देण्याची मागणी केली; मात्र अधिकार्‍यांनी त्यास नकार दिल्यानंतर त्याने धमक्या देणे चालू केले. यानंतर एका अज्ञात व्यक्तीनेही अधिकार्‍याला दूरभाष केला. या व्यक्तीने स्वतःला दाऊद इब्राहिम आणि ‘डी-कंपनी सिंडिकेट’शी संबंधित असल्याचे सांगितले. गेली ३० वर्षे या संघटनेसाठी काम करत असल्याचा दावा करत ‘अधिकार्‍याला आणि त्यांच्या कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी दिली.

संपादकीय भूमिका

  • ही अत्यंत गंभीर आणि देशाच्या सुरक्षेला आव्हान देणारी घटना आहे. असे धाडस या जिहादी घटकांमध्ये होतेच कसे ? याच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे ! 
  • भारताच्या भूमीवर राहून आंतरराष्ट्रीय तस्करांना साहाय्य करणार्‍या आणि शासकीय अधिकार्‍यांवर दबाव आणणार्‍या या ‘सिंडिकेटची’ मुळे आता मुळासकट उखडून टाकणे आवश्यक !