१५ दिवसांत एस्.टी.च्या उत्पन्नात ४३ कोटी ८३ लाखांची वाढ !

  • बसस्थानकाच्या परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाईचा परिणाम

  • प्रतिदिन उत्पन्न ३ कोटी रुपयांनी वाढले !

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई – परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार, तसेच तत्कालीन औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशाची प्रभावी कार्यवाही करत राज्यभरातील बसस्थानकांच्या २०० मीटर परिघातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात मुख्य सुरक्षा अन् दक्षता अधिकारी श्रीमती प्रियांका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली. मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले असून महामंडळाच्या उत्पन्नावर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. १ जून ते १५ जून या कालावधीत महामंडळाचे एकूण वाहतूक उत्पन्न ४९५ कोटी ३४ लाख रुपये झाले आहे. वर्ष २०२५ मध्ये याच कालावधीतील ४५१ कोटी ५१ लाख रुपयांच्या तुलनेत ४३ कोटी ८३ लाख रुपयांची (९.७१ टक्के) वाढ नोंदवण्यात आली आहे. प्रतिदिनचे सरासरी उत्पन्न ३ कोटी रुपयांनी वाढले आहे.

या कालावधीत पुणे (५ कोटी ९७ लाख रुपये), सातारा (३ कोटी ४६ लाख रुपये), छत्रपती संभाजीनगर (२ कोटी ६६ लाख रुपये), नांदेड (२ कोटी २७ लाख रुपये), रायगड (२ कोटी १७ लाख रुपये) आणि अमरावती (१ कोटी ६० लाख रुपये)  या विभागांनी सर्वाधिक उत्पन्नवाढ नोंदवली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, ‘‘बसस्थानकच्या परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीमुळे महामंडळाची प्रवासी संख्या आणि महसूल यांच्यावर परिणाम होत होता. न्यायालयाच्या आदेशानुसार परिवहन विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस आणि महामंडळ प्रशासन यांनी केलेल्या संयुक्त कारवाईमुळे प्रवाशांचा एस्.टी.कडे ओढा वाढला असून त्याचे प्रतिबिंब उत्पन्नवाढीत दिसले. राज्यातील प्रत्येक बसस्थानक परिसर अवैध प्रवासी वाहतुकीपासून मुक्त करण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि कायदेशीर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे, हे शासनाचे प्राधान्य आहे.’’

संपादकीय भूमिका

अवैध प्रवासी वाहतूक करण्याचे कुणाचे धाडस होऊ नये, अशी पत पोलिसांनी निर्माण करणे आवश्यक !