भाजपची विचारसरणी सोडून अन्य पक्षात गेलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश नाही ! – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण  

  • रत्नागिरीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा

  • माजी जिल्हा परिषद सदस्य सहदेव बेटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

रत्नागिरी – भाजपची सत्ता केंद्रापासून राज्यापर्यंत पोचण्यामागे तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचे योगदान आहे. भाजपची विचारसरणी सोडून अन्य पक्षात गेलेल्यांना मी प्रदेशाध्यक्ष असतांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अशी चेतावणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

या मेळाव्यात चिपळूण, खेड, मंडणगड, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यांतील अनुमाने ५०० हून अधिक माजी लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी जिल्हा परिषद सदस्य सहदेव बेटकर यांनीही या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला भाजपचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

रवींद्र चव्हाण म्हणाले की,

१. कोकणातील तरुण रोजगारासाठी मुंबईकडे स्थलांतर करतात आणि त्यामुळे गावे ओस पडत आहेत. या परिस्थितीत पालट घडवण्यासाठी धार्मिक पर्यटन हा प्रभावी पर्याय ठरू शकतो.

२. मार्लेश्वर, गणपतीपुळे, संगमेश्वर सूर्यमंदिर, कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक, तसेच राजापूर येथील श्री धूतपापेश्वर मंदिर यांसारख्या स्थळांचा विकास करून रोजगारनिर्मिती साधता येईल.

३. स्थानिक पदाधिकार्‍यांनी पर्यटन विकास आराखडे तयार करून पक्षाकडे पाठवावेत.

४. प्रत्येक गावात किमान ५ कट्टर विचारांचे भाजप कार्यकर्ते उभे करा.