३ तक्रारी प्रविष्ट करूनही अद्याप गुन्हा नोंद नाही !

  • अयोध्येतील श्रीराममंदिरातील चोरीचे प्रकरण

  • विशेष अन्वेषण पथकाकडून चौकशी चालू

AI निर्मित छायाचित्र

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीराममंदिरात अर्पण केलेल्या दानाची चोरी झाल्याच्या प्रकरणी पोलिसांकडे ३ तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या असल्या, तरी अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. पहिली तक्रार ‘धर्मसेना’ संघटनेचे संस्थापक अन् कारसेवक (श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील कार्यकर्ते) संतोष दुबे यांनी, दुसरी उत्तरप्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद शुक्ला आणि तिसरी करणी सेना यांनी प्रविष्ट केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष अन्वेषण पथकाची स्थापना केली असून चौकशीही चालू झाली आहे.

पथकाने श्रीरामजन्मभूमी मंदिर तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडून देणगी चोरीविषयी माहिती घेतली होती. याव्यतिरिक्त न्यासाचे सदस्य गोपाल राव यांना बोलावून त्यांची चौकशी केली. पथकाने ४२ संशयित कर्मचार्‍यांचीही चौकशी केली.

आरोपींना अटक झाली नाही, तर करणी सेना आंदोलन करील !

करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष अभिनव सिंह यांनी म्हटले की, दोषींना कारागृहात पाठवले पाहिजे. अन्वेषण करतांना पोलीस सामान्य लोकांना कारागृहात डांबतात; मात्र या प्रकरणात आरोपी मोकाट फिरत आहेत. जर गुन्हा नोंदवला गेला नाही आणि आरोपींना अटक झाली नाही, तर करणी सेना आंदोलन करील, अशी चेतावणी त्यांनी दिली.

आतापर्यंत २ कोटी रुपयांची वसुली

या चोरी प्रकरणात आतापर्यंत ५ लोकांची नावे समोर आली आहेत. लवकुश, अवनीश, अनुकल्प, करुणे आणि रामशंकर अशी या ५ जणांची नावे आहेत. या लोकांनी चौकशीच्या वेळी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. हे सर्व जण दान केलेल्या रकमेच्या मोजणीच्या कामाशी संबंधित आहेत. लवकुश आणि अनुकल्प पोलीस कोठडीत आहेत.