‘नाईट क्लब’ना आता केवळ बंद खोलीत ध्वनीक्षेपकाला अनुमती

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण आणणारा मोठा निर्णय

पणजी , १६ जून (वार्ता.) – गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोव्यातील ‘नाईट लाईफ’मध्ये पालट करणारा आणि ध्वनीप्रदूषणाला आळा घालणारा मोठा निर्णय घेतला आहे. मंडळाने राज्यातील सुमारे ४० नाईट क्लब आणि उपाहारागृहे यांना मोठ्या आवाजात संगीत केवळ बंद खोलीतच लावण्यास अनुमती देण्याचे ठरवले आहे आणि नियमामध्ये या दृष्टीने पालट केले आहेत.

१. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील समुद्रकिनारपट्टीमधील नाईट क्लब आणि उपाहारगृहे येथे ‘रियल टाईम ऑनलाईन’ ध्वनी देखरेख यंत्रणा बसवली होती. या ठिकाणच्या ध्वनीप्रदूषणाची मंडळाला ‘ऑनलाईन’ स्वरूपात माहिती मिळत होती; मात्र या ठिकाणी नोंद झालेले ध्वनीप्रदूषण हे यंत्रणा बसवलेल्याच ठिकाणचे आहे कि ते अन्य ठिकाणचा आवाज या यंत्रणेत नोंद झालेला आहे, याची निश्चिती या यंत्रणेच्या माध्यमातून होत नव्हती. मंडळाला ३ आस्थापनांनी ‘रियल टाईम ऑनलाईन’ ध्वनी देखरेख यंत्रणेत नेमका आवाज कुठला नोंदवला गेला, याची निश्चिती होत नसल्याचे सांगितले होते.

२. यामुळे मंडळाने ‘रियल टाईम ऑनलाईन’ ध्वनी देखरेख यंत्रणेच्या माध्यमातून ध्वनीप्रदूषण केल्याचे निदर्शनास आलेल्या राज्यातील २८ प्रसिद्ध नाईट क्लब आणि उपाहारगृहे यांच्या विरोधात नोंदवलेली निरीक्षणे मागे घेतली आहेत. यानंतर मंडळाने ‘रियल टाईम ऑनलाईन’ ध्वनी देखरेख यंत्रणा बसवलेल्या ३८ आस्थापनांचा व्यवसाय करण्याच्या परवान्यात (कन्सेंट टू ऑपरेट) पालट केलेला आहे आणि त्यांच्यावर पूर्वी घातलेले निर्बंध हटवले आहेत.

३. मंडळाने नियमामध्ये पालट करून आता केवळ बंद खोलीत ध्वनीक्षेपक लावण्यास अनुमती देण्याचे ठरवले आहे. या बंद खोलीला योग्य ध्वनीरोधक आणि दुहेरी प्रवेश-निर्गमन दरवाजा यांची व्यवस्था असणे आवश्यक आहे, तसेच या व्यवस्था अग्नीशमन आणि वीज खाते यांनी पडताळून संमती दिलेली असणे आवश्यक आहे. रात्री १० ते सकाळी ६ या काळात खुल्या जागेत ध्वनीक्षेपक, वाद्य आदींना अनुमती दिली जाणार नाही; मात्र याला राज्य सरकारने एखाद्या कार्यक्रमाला मध्यरात्रीपर्यंत अनुमती दिली, तर तो अपवाद ठरणार आहे.