सर्वेक्षण करण्यास आलेल्या कर्मचार्यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप : ४० ते ५० ग्रामस्थांवर गुन्हे नोंद

सावंतवाडी – खाण प्रकल्पामुळे ग्रामस्थांच्या पारंपरिक उत्पन्नाचा स्रोत नष्ट होणार आहे. जसे रेडी गाव खाण उद्योगामुळे उद्ध्वस्त झाले, तसेच आजगावही उद्ध्वस्त होईल, अशा भावना व्यक्त करत गावात सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचार्यांना ग्रामस्थांनी १५ जूनला सायंकाळी तीव्र विरोध केला. या वेळी ग्रामस्थ आणि सर्वेक्षण करणारे यांच्यात बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. जे.एस्.डब्ल्यू. या आस्थापनाच्या खाण प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे सांगून याच्या विरोधात ग्रामस्थांनी १५ जूनच्या सायंकाळी आजगाव येथे ग्रामदैवत श्री वेतोबा मंदिरामध्ये जनआंदोलन चालू केले. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे या प्रकरणात नाव आल्याने दळवी यांच्या विरोधात ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.
ग्रामस्थांच्या आंदोलनाला सर्वपक्षियांनी पाठिंबा दिला. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, माजी आमदार वैभव नाईक, अधिवक्ता स्वप्नील आजगावकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांचा विरोध असतांनाही सर्वेक्षण करणार्यांवर कारवाई का नाही ? – डॉ. जयेंद्र परूळेकर
आजगाव परिसरात खाण प्रकल्पावरून ग्रामस्थांच्या झालेल्या उद्रेकावरून सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परूळेकर म्हणाले, ‘‘ग्रामसभेने विरोधाचा ठराव संमत केलेला असतांनाही सर्वेक्षणाला कशी अनुमती देण्यात आली ? ग्रामस्थांचा विरोध असतांनाही सर्वेक्षण करणार्यांवर कारवाई का झाली नाही ? पर्यावरणाला हानी पोचवणारे प्रकल्प कोकणातच का आणले जातात ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.’’
ग्रामस्थांनी सांगितले की,
१. ‘जे.एस्.डब्ल्यू.’ या आस्थापनासाठी काम करणार्यांचे (मायनिंग लॉबीचे) प्रस्थ वाढत चालले आहे. खाण प्रकल्पामुळे रेडी गाव भकास करण्यात आले आहे. तशी दयनीय स्थिती आजगाव, धाकोरा, भोमवाडी, तिरोडा, शिरोडा, आरवली आणि आसोली गावांची होणार आहे.
२. शेती, कोकम, नारळ बागायती, तसेच सुरंगी फुलांचे उत्पादन दशक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. खाण प्रकल्प झाल्यास ग्रामस्थांच्या पारंपरिक उत्पन्नाचे स्रोत नष्ट होणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प गावात नको. या प्रकल्पाला आमचा विरोध आहे, असे निवेदन आम्ही प्रशासनाला दिले होते, तरीही ८४० हेक्टरमध्ये होणार्या ‘जे.एस्.डब्ल्यू.’ प्रकल्पासाठी ड्रोन सर्वेक्षणाला जिल्हा परिषद प्रशासनाने अनुमती दिल्याचे आम्हाला समजले.
३. आस्थापनाच्या कर्मचार्यांनी १५ जूनला सकाळी सर्वेक्षणाला प्रारंभ केला; मात्र ग्रामस्थांनी विरोध दर्शवल्यानंतर काम थांबवण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा चालू करण्यात आले.
४. यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेण्यात आलेले नाही. आजगाव आणि परिसरातील गावे सुपिक आहेत. त्यामुळे कुणालाही हा प्रकल्प नको आहे. आम्हाला जे नको आहे, ते आमच्या माथी मारू नका.
‘नाईट क्लब’ना आता केवळ बंद खोलीत ध्वनीक्षेपकाला अनुमती
महिलेला गर्भवती करून सोडून दिले : गुन्हा नोंद
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार : एका तरुणाला अटक
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याच्या प्रकरणी मीर शाह याला अटक
‘संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या’च्या देहूरोड मार्गावर २९ गतीरोधक !
‘देवस्थान इनाम भूमी खालसा करा !’ – अखिल भारतीय किसान सभा