‘जागतिक योगदिन’ कार्यक्रमात गोव्यात २ लक्ष लोकांचा सहभाग अपेक्षित ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यभरात १ सहस्र ठिकाणी योगासनांचे कार्यक्रम

सरकारी कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षक यांना उपस्थिती सक्तीची

प्रदर्शन पहातांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार राजेश फळदेसाई आणि रुडॉल्फ फर्नांडिस

पणजी, १६ जून (वार्ता.) – रविवार, २१ जून या जागतिक योगदिनी सरकारी कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षक यांना उपस्थिती सक्तीची आहे. रविवार सुटीचा दिवस असला, तरी कार्यक्रमात सहभागी व्हावे लागणार आहे. राज्यभरात १ सहस्र ठिकाणी सकाळी ६ वाजता योगसनांचे कार्यक्रम होणार आहेत. त्यास २ लाखांहून अधिक उपस्थिती अपेक्षित आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या वेळी क्रीडामंत्री रमेश तवडकर आणि मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘प्रत्येकाने स्वतःच्या घरापासून जवळ असलेल्या ठिकाणी योगदिनात सहभागी व्हावे. मंत्री, आमदार, जिल्हा पंचायत सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. राज्यात मधुमेह आणि इतर आजार झपाट्याने वाढत आहेत अन् यामुळे नित्यनेमाने प्राणायाम, ध्यानधारणा, योगासने आदी करणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सुटी असली, तरी योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला पाहिजे. भाग घेणार्‍या प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले जाणार आहे.’’


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याचे प्रकरण

महत्त्वाच्या योजनांची माहिती देणार्‍या भित्तीपत्रकांच्या (पोस्टर्सच्या) प्रदर्शनाचे ४ ठिकाणी आयोजन

पणजी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लीच पंतप्रधान या नात्याने १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या निमित्ताने गोवा सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात चालू झालेल्या महत्त्वाच्या योजनांची माहिती देणारे भित्तीपत्रक प्रदर्शन ४ ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला सर्व नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १६ जून या दिवशी पणजी येथील कदंब बसस्थानक परिसरात भरवलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार राजेश फळदेसाई, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस आणि इतर अधिकारी उपस्थित होते. अशाच प्रकारचे प्रदर्शन म्हापसा, मडगाव आणि कुडचडे येथील कदंब बसस्थानक परिसरात १६ ते १८ जून या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही गोव्यातील जनतेच्या वतीने अभिनंदन करतो. त्यांच्या कार्यकाळात केंद्र आणि राज्य येथील भाजप सरकारमुळे (डबल इंजिन सरकारमुळे) गोव्याच्या विकासाला गती मिळाली आहे. या १२ वर्षांच्या काळात नारी शक्ती, किसान शक्ती, युवा शक्ती आणि गरिबांचे कल्याण या ४ स्तंभांवर सरकारने काम केले आहे. आम्ही विकासकामांसमवेतच मनुष्याच्या विकासालाही प्राधान्य देत आहोत. मागील १२ वर्षांच्या काळात केंद्र सरकारने विविध लोकहिताच्या योजना चालू केल्या आहेत. याची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी हे प्रदर्शन भरवले आहे. पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोचवण्यासाठी प्रदर्शन लाभदायक ठरणार आहे.’’ या वेळी इतरांचेही मार्गदर्शन झाले.