कोकण रेल्वे पावसाळापूर्व सर्व सिद्धता करून पूर्णपणे सज्ज !

रत्नागिरी – पावसाळ्याच्या कालावधीत कोकणातील मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे निर्माण होणारी आव्हाने लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने या वर्षाची पावसाळापूर्व सिद्धता पूर्ण केली आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि अखंड रेल्वे सेवा या सर्वोच्च प्राधान्यांना डोळ्यांसमोर ठेवून संपूर्ण मार्गावर व्यापक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. चालू वर्षातील पावसाळा विशेष वेळापत्रक १५ जून ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत लागू रहाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
१. मार्गावरील डोंगराळ भागांतील उतारांची स्थिरता वाढवण्यासाठी उतारांची तीव्रता कमी करणे, माती सरकण्याला प्रतिबंध करणे (सॉइल नेलिंग), मोठे दगड बोल्टने बांधणे (रॉक बोल्टिंग) आणि काँक्रिटचा फवारा मारणे (शॉटक्रिटिंग) अशी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे दरडी दगड कोसळण्याचा धोका लक्षणीयरित्या न्यून झाला आहे.
२. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठिकाणी दगड भरलेल्या जाळीच्या मजबूत भिंती (गॅबियन भिंती), माती रोखणार्या संरक्षक भिंती (रिटेनिंग वॉल्स), भूमीखालील खांब (मायक्रोपाइल्स) आणि लोखंडी जाळी (बोल्डर नेटिंग) यांसारख्या आधुनिक भू-तांत्रिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
३. रेल्वे मार्गालगतच्या साइड ड्रेन्स आणि कॅचवॉटर ड्रेन्सची स्वच्छता (रूळाशेजारील नाले आणि पाणी थोपवून ठेवणारे नाले यांची स्वच्छता) पूर्ण झाली आहे, तसेच अतीवृष्टीच्या काळात पाण्याचा निचरा करण्यासाठी ठिकठिकाणी पोर्टेबल डीवॉटरिंग पंप तैनात करण्यात आले आहेत.
४. गस्त आणि तातडीची मदत यंत्रणा
अ. रेल्वे मार्गाच्या देखरेखीसाठी ६५७ प्रशिक्षित कर्मचारी २४ घंटे गस्त घालणार आहेत.
आ. चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि वेरणा येथे उत्खनन यंत्रे (Excavator) सज्ज ठेवण्यात आली आहेत. वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेरणा, कारवार, भटकल आणि उडुपी या ९ महत्त्वाच्या ठिकाणी रेल्वे मेंटेनन्स वाहने (RMVs) तैनात आहेत.
इ. माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमळी, कारवार आणि उडुपी येथे टॉवर वॅगन्स सज्ज आहेत. वेरणा येथे अपघात निवारण रेल्वे (ART) अवघ्या १५ मिनिटांत रवाना होण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.
५. अल्प दृश्यमानतेच्या परिस्थितीत लोको पायलटांना रेल्वेचा वेग ताशी ४० कि.मी.पर्यंत मर्यादित ठेवण्याचे निर्देश आहेत.
६. रेल्वे रूळांच्या पातळीपेक्षा १०० मि.मी.पेक्षा जास्त पाणी साचल्यास गाड्या तात्काळ थांबवण्यात येतील आणि पाणी ओसरल्यानंतरच वाहतूक पूर्ववत् केली जाईल.
७. बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे २४ घंटे कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष चालू करण्यात आले आहेत.
८. प्रवासी रेल्वेच्या अद्ययावत माहितीसाठी आणि वेळापत्रकासाठी www.konkanrailway.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !
अहिल्यानगर येथे धार्मिक सहलीचे आमीष दाखवून आर्थिक फसवणूक !
‘हिंदु खाटिक समाज आर्थिक विकास महामंडळा’च्या योजनांचा लाभ घेण्याचे अवाहन !
राज्यातील धरणांमध्ये २५ टक्के पाणीसाठा शेष !
कराड येथे जप्त केलेले ‘सायलेन्सर’ आणि ‘प्रेशर हॉर्न’ ‘रोडरोलर’ने चिरडले !
श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात निर्माण होणार ‘हेरिटेज वाडी’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली भूमीची पहाणी