Violence In Manipur : मणीपूरमध्ये वांशिक हिंसाचार चालूच : आतंकवाद्यांकडे  २७ प्रकारची १ सहस्राहून अधिक घातक शस्त्रे !

सुरक्षादलांसमोर मोठे आव्हान !

इंफाळ (मणीपूर) – मणिपूरमध्ये वांशिक हिंसाचार चालूच आहे. राज्यातील आतंकवाद्यांकडे २७ प्रकारची १ सहस्राहून अधिक घातक शस्त्रे आहेत. त्यामुळे सुरक्षादलांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या शस्त्रांमध्ये एके-सिरीज रायफल्स, स्नायपर रायफल्स यांसारख्या आधुनिक शस्त्रांचा समावेश आहे. ही अवैध शस्त्रे जप्त करणे, हे सुरक्षादलांचे प्राथमिक प्राधान्य आहे.

१. सुरक्षादल येत्या काही दिवसांत राज्यभरात एक विशेष सुरक्षा जाळे सिद्ध करत आहे. यानंतर अवैध शस्त्रे बाळगणार्‍यांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये एकाच वेळी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

२. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २ कोब्रा बटालियन (तुकड्या) मणीपूरमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.

३. मणीपूरमध्ये आसाम रायफल्स, सीआरपीएफ, बीएसएफ, स्थानिक पोलीस आणि इतर सुरक्षादलांचा समावेश असलेली एक जाळे (ग्रिड) सिद्ध केले जात आहे.

४.  सूत्रांनी सांगितले की, ही मोहीम मोठ्या प्रमाणात नक्षलवाद संपवण्यासाठी वापरलेल्या मोहिमेसारखीच असेल. तथापि मणीपूरमधील आतंकवाद्यांची पुरवठा साखळी तोडणे सोपे नाही. मणीपूरची आंतरराष्ट्रीय सीमा म्यानमारला लागून असून सीमेला कुंपण नाही. (यास देशावर ६ दशकांहून अधिक काळ राज्य करणारी काँग्रेसच सर्वाधिक उत्तरदाय आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

आतंकवाद्यांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे येत असल्याचे गुप्तचर यंत्रणा, तसेच पोलीस यांना कळले कसे नाही ?