Constable Suspended : फुकट पाणीपुरी आणि आईस्क्रीम खाणारा हवालदार निलंबित !

कानपूर (उत्तरप्रदेश) – एका दुकानातून फुकट पाणीपुरी आणि आईस्क्रीम खाणार्‍या एका हवालदाराला कानपूर पोलिसांनी निलंबित केले. या हवालदाराचा आईस्क्रीम खातांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला होता. या प्रकरणी पीडित दुकानदाराने पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीत म्हटले होते की, ११२ या ‘आपत्कालीन प्रतिसाद सेवे’अंतर्गत तैनात असलेला हवालदार त्याचे वाहन प्रतिदिन एका दुकानासमोर लावत असे. या वेळी हा हवालदार तेथीलच रस्त्यावरील एका विक्रेत्याकडून नियमितपणे पाणीपुरी आणि एका दुकानातून आईस्क्रीम खात होता; परंतु त्याचे पैसे देत नव्हता. या प्रकरणी कानपूरचे साहाय्यक पोलीस आयुक्त आनंदकुमार झा यांनी या घटनेचे अन्वेषण करण्याचा आदेश दिला. अन्वेषणात हे आरोप सत्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या हवालदाराला निलंबित करण्यात आले. त्याचे नाव कळू शकले नाही.

 

संपादकीय भूमिका

अशा पोलिसांना त्यांच्या वर्दीची घमेंड असल्यानेच ते स्वतःला जनतेचे मालक समजतात आणि जनतेशी तुच्छतेने वागतात ! असे ज्या ज्या ठिकाणी होते, तेथील संबंधित पोलिसांवरही अशीच कठोर कारवाई केली पाहिजे !