पाषाण तलावातील माशांच्या मृत्यूप्रकरणी ५ अधिकार्‍यांचे निलंबन मागे

पाषाण तलाव येथे मृत झालेले मासे

पुणे – महापालिकेने पाषाण तलावातील सहस्रो माशांच्या मृत्यूप्रकरणी २ अभियंते, आरोग्य निरीक्षक, सेवक वर्ग विभागात नियमांचे उल्लंघन केलेले अधीक्षक आदींचे निलंबन मागे घेतले आहे, तसेच त्यांची विभागीय चौकशी रहित करून त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या बदल्या केल्या आहेत. पाषाण तलावात दूषित पाण्यामुळे सहस्रो माशांचा मृत्यू झाला होता. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पाषाण तलावाला भेट दिल्यानंतर त्यांना अधिकारी सांगत असलेली माहिती आणि खरी स्थिती यांत तफावत दिसून आली. त्यामुळे त्यांचे निलंबन मागे घेतले. (असे अधिकारी असल्यास महापालिकेतील निर्णय योग्य होणार का ? यासाठी खोटी माहिती देणार्‍यांवरही कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)

आयुक्तांनी २ कार्यकारी अभियंता, विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक यांचे निलंबन केले होते, तसेच सामान्य प्रशासन विभागात अनियमितता दिसल्याने अतिरिक्त आयुक्तांनी अधीक्षकांचे (प्रभारी प्रशासन अधिकारी) निलंबन केले होते; मात्र या पाचही अधिकार्‍यांचे निलंबन मागे घेतले आहे. सामान्य प्रशासन विभागातील अधीक्षकांची औंध बाणेर येथील क्षेत्रीय कार्यालयात बदली केली आहे.

संपादकीय भूमिका

हा प्रकार म्हणजे ‘मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर’, असाच झाला. यामुळे काम न करणार्‍या अधिकार्‍यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. कामचुकार अधिकार्‍यांचे निलंबन करून त्यांच्यावर कारवाई केली, तरच प्रशासनात योग्य पद्धतीने काम करण्याचा संदेश जाईल !