खरेतर आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुन्हेगार आहोत !

  • ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांचे विधान

  • जातीय मनोवृत्तीतून मराठ्याच्या इतिहासाला वेडीवाकडी वळणे

ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. सदानंद मोरे

पुणे – ‘फोडा आणि झोडा’ ही ब्रिटिशांची नीती आपल्यामध्ये रुजली आहे; म्हणून सर्व गोष्टींकडे जातीय दृष्टिकोनातून पहाण्याची वृत्ती घातक आहे. अजूनही आपण जातीची धुणी धुवत आहोत. त्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा वापर करून घेतला आहे. खरेतर आपण त्यांचे गुन्हेगार आहोत’, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी मांडले.

‘भारत इतिहास संशोधक मंडळा’च्या वतीने ‘मराठ्यांच्या इतिहासाचे खंडन – वाटा आणि वळणे’ या विषयावर डॉ. सदानंद मोरे ‘अ.रा. कुलकर्णी व्याख्यानमाले’त बोलत होते.

१. व्यापारासाठी आलेल्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने दत्ताजीराव शिंदे यांचा म्हणजे मराठ्यांचा पराभव करून भारत कह्यात घेतला. काही ब्रिटीश इतिहासकारांनी राज्य मोगलांकडून घेतले असा प्रसार केला.

२. काही इतिहासकारांनी मराठ्यांना बेदखल करत राजपुतांना मोठे केले. त्याला उत्तर अ.रा. कुलकर्णी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने महाराष्ट्राला नायक मिळाला’, असे सांगितले.

३. संस्कृतमध्ये लेखन करणारे ब्राह्मण, पोवाडे लिहणारे गोंधळी, बखर लिहणारे बहुतांश कायस्थ प्रभू होते. ही जातीव्यवस्था लेखनातही दिसते.

. ही मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अवतारी पुरुष मानायची. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रीय नायक आहेत’, हे पहिल्यांदा लोकमान्य टिळकांनी सांगितले.

४. इंग्रज लेखक ग्रँड डफ याने बढाई करून लिहिले की, ‘शिवाजी बंडखोर होते’ त्यांचे खंडन नीलकंठ कीर्तने यांनी करत ‘शिवाजी महाराज यांचे राज्य ही क्रांती होती’, असे सांगितले.

५. पहिले शिवचरित्र राजारामशास्त्री भागवत यांनी लिहिले. ‘भागवतधर्म हाच महाराष्ट्र धर्म आहे’, अशी मांडणी म.गो. रानडे यांनी केली. जदुनाथ सरकार यांनी केलेल्या शिवचरित्रातून छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती राज्याबाहेर पोचवली. नंतरच्या काळात जातीय दृष्टिकोनातून पहाण्याच्या वृत्तीतून मराठ्यांचा इतिहास वेडीवाकडी वळणे घेत गेला.