Ebola Outbreak : ‘इबोला’ रोगाचा जगभरात उद्रेक, भारत सरकारनेही दिल्या मार्गदर्शक सूचना !

जागतिक आरोग्य संघटनेने एका आठवड्यापूर्वीच केली आहे ‘जागतिक आरोग्य आणीबाणी’ची घोषणा

नवी देहली – कोरोना महामारीनंतर प्रथमच जागतिक आरोग्य संघटनेने १७ मे या दिवशी ‘जागतिक आरोग्य आणीबाणी’ची घोषणा केली आहे. आफ्रिकी देशांमध्ये ‘इबोला’ हा साथीचा रोग वेगाने पसरत आहे. जागतिक पातळीवर वाढत असलेले हे संकट लक्षात घेऊन भारत सरकारनेही सतर्कतेची चेतावणी देत मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या आहेत.

कांगो आणि युगांडा या आफ्रिकी देशांमध्ये इबोलाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. यामुळे ‘आफ्रिका सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ या संस्थेने इबोलाविषयी गंभीर चेतावणी दिली.

कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या आफ्रिकी देशांत जाणे टाळा ! – भारत सरकारचे नागरिकांना आवाहन

भारताच्या आरोग्य मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी परदेशातील प्रवासासंदर्भात सूचना देतांना म्हटले की, दुसर्‍या देशात प्रवास करत असाल, तर काळजी घ्या. नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या आफ्रिकी देशांमध्ये प्रवास करणे पूर्णपणे टाळावे. जोपर्यंत या देशातील परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत अत्यावश्यक नसेल, तर प्रवास करू नये. जे लोक सध्या या देशांमध्ये आहेत किंवा येथून काही लोक अत्यावश्यक कामासाठी भारतात येत आहेत, त्यांनी सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.