पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी रत्नागिरी पालिका ‘गोल्डन ड्रॉप’ तंत्रज्ञानाचा वापर करणार


रत्नागिरी – पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे आणि त्यामुळे होणार्‍या चिखलाचा मनस्ताप आता नागरिकांना सहन करावा लागणार नाही. रत्नागिरी नगर परिषदेने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नाशिकच्या एका नामांकित आस्थापनाकडून ‘गोल्डन ड्रॉप’ हे आधुनिक रेडीमिक्स तंत्रज्ञान वापरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

१. दरवर्षी मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील रस्त्यांवर मोठे खड्डे पडतात. नगर परिषदेकडून हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात दगड आणि पावसाळी डांबर यांनी भरले जात असले, तरी पाण्याच्या प्रवाहामुळे ते पुन्हा उखडून जात असत.

२. यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. यावर उपाय म्हणून नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने हे नवीन तंत्रज्ञान आणले आहे.

३. गेल्या वर्षी रत्नागिरी शहरातील काही वर्दळीच्या ठिकाणी या तंत्रज्ञानाची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली होती, जी अत्यंत यशस्वी ठरली. या द्रव्याने भरलेले खड्डे वर्षभरानंतरही सुस्थितीत असून ते वाहनांच्या वजनामुळे किंवा पाण्याच्या मार्‍यामुळे पुन्हा उखडत नाहीत.

४. आगामी पावसाळा आणि कोकणातील महत्त्वाचा सण असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, शहरातील मुख्य रस्ते आधीच खड्डेमुक्त करण्यात आले आहेत; मात्र ऐन पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रस्त्यांची दुरवस्था होऊ नये;म्हणून नगर परिषदेने या विशेष रेडीमिक्सचा साठा आधीच उपलब्ध ठेवण्याचे नियोजन केले आहे.

 ‘गोल्डन ड्रॉप’ तंत्रज्ञान काय आहे ?

गोल्डन ड्रॉप तंत्रज्ञान हे प्रामुख्याने पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे भरण्यासाठी विकसित केलेले एक अत्याधुनिक कोल्ड मिक्स तंत्रज्ञान आहे. हे डांबर, इमल्शन आणि काही विशेष रसायनांचा वापर करून बनवलेला एक तयार घोल असतो. हे रसायन पाण्याचा प्रतिकार करून खडकांशी आणि जुन्या रस्त्याशी अतिशय घट्ट पकड निर्माण करते. पावसाळ्यात नेहमीच्या पद्धतीने (हॉट मिक्स डांबराने) खड्डे भरणे अशक्य असते; कारण डांबर आणि पाणी यांचे वैर आहे. अशा वेळी ‘गोल्डन ड्रॉप’ तंत्रज्ञान प्रभावी ठरू ठरते. या तंत्रज्ञानाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असतांनाही हे मिश्रण तिथे थेट वापरता येते. खड्ड्यातील पाणी उपसण्याची किंवा रस्ता सुकण्याची वाट पाहावी लागत नाही.