१ सहस्र विद्यार्थ्यांना पेपर विकणार्‍या सूत्रधाराचा केंद्रीय यंत्रणा घेत आहेत शोध !

  • ‘नीट’ परीक्षा प्रश्‍नपत्रिका फुटीचे प्रकरण

  • प्रा. शिवराज मोटेगावकरच्या मुलालाही घेतले कह्यात

प्रा. शिवराज मोटेगावकर

मुंबई/नागपूर – ‘नीट’ परीक्षा प्रश्‍नपत्रिका फुटी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या संपूर्ण जाळ्याचा ‘नांदेड पॅटर्न’ पडताळतांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (‘सीबीआय’च्या) हाती नागपूर येथील ‘आलोक’ नावाच्या मुख्य सूत्रधाराचा सुगावा लागला आहे. आलोकने किमान १ सहस्र विद्यार्थ्यांना ‘नीट’चा पेपर विकल्याचा दाट संशय असून ‘सीबीआय’ने त्याच्याभोवती पाश आवळण्यास प्रारंभ केला आहे.

आलोकने पुण्यात गोपनीय ठिकाणी विद्यार्थ्यांना जमवून प्रश्‍नपत्रिका सांगितली !

‘सीबीआय’च्या प्राथमिक चौकशीत आलोकने परीक्षा चालू होण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना पुण्यात बोलावून घेतले होते. तेथे एका अत्यंत गोपनीय ठिकाणी या विद्यार्थ्यांना ठेवून त्यांच्याकडून प्रत्यक्ष प्रश्‍नपत्रिका पाठ करून (रटवून) घेण्यात आल्याचा संशय आहे. ‘आलोक हा नागपुरातील एखाद्या मोठ्या टोळीचा भाग आहे कि तोच या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे ?’, याचा शोध ‘सीबीआय’चे अधिकारी घेत आहेत.

नांदेडच्या अश्‍विनी कदम यांच्या चौकशीतून नावाचा खुलासा

‘सीबीआय’चे मुंबईतील महानिरीक्षक हर्षवर्धन आणि पुणे ‘सीबीआय’चे अन्वेषण प्रमुख विनोद चौधरी यांनी नांदेड येथे घातलेल्या धाडीत आलोक नावाच्या व्यक्तीचा उलगडा झाला. नांदेडमधील उपाहारगृह व्यावसायिक कदम परिवाराची चौकशी केली असता अश्‍विनी कदम नावाच्या महिलेने स्वत:च्या मुलीसाठी तब्बल ५ लाख रुपयांना ‘नीट’चा पेपर खरेदी केल्याचे मान्य केले आहे. यासाठी २५ सहस्र रुपये ऑनलाईन ‘टोकन मनी’ म्हणून दिले गेले होते. त्यानंतर आलोकनेच ही मुलगी आणि तिचे कुटुंबीय यांना १५ दिवस पुण्यात एका गुप्त ठिकाणी थांबवून ठेवून पेपर दिला होता.

प्रा. शिवराज मोटेगावकर याला कोठडी; मुलाचीही सीबीआयकडून चौकशी

या प्रकरणी अटक केलेले लातूरच्या नामांकित ‘आर्.सी.सी. शिकवणीवर्गा’चा संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याला न्यायालयाने ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. मोटेगावकर याने स्वत:च्या मुलाला परीक्षेत अनधिकृत लाभ मिळवून देण्यासाठी या पेपरफुटीच्या जाळ्याचा वापर केल्याचा संशय असल्याने ‘सीबीआय’ने त्याच्या मुलालाही पुण्यात चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढताच नांदेडमधील अनेक नामांकित शिकवणीवर्गांच्या संचालकांचे धाबे दणाणले आहेत. सत्र संपल्याचे कारण पुढे करत अनेक शिकवणीवर्गांनी स्वत:ची कार्यालये बंद केली आहेत, तर काही संशयित संचालक शहरातून पसार झाले आहेत.

‘एन्.टी.ए.’च्या प्रमुखांना संसदेचे समन्स; राज्यभरात तीव्र पडसाद !

वाढत्या वादामुळे आता परीक्षा घेणारी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’(एन्.टी.ए.) अडचणीत आली आहे. संसदीय स्थायी समितीने याची गंभीर नोंद घेत एन्.टी.ए.चे अध्यक्ष प्रदीप कुमार जोशी आणि शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यांना समन्स बजावले आहे. २१ मे या दिवशी संसदेत यावर उच्चस्तरीय बैठक होणार आहे. एन्.टी.ए.च्या प्रमुखांना यावर स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. दुसरीकडे या घोटाळ्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसेना पदाधिकार्‍यांनी खासगी शिकवणीवर्गांच्या परिसरातील मोटेगावकर याच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणा देऊन त्यांच्या नामफलकावर काळी शाई फेकून तीव्र निषेध व्यक्त केला, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ए.आय.एम्.आय.एम.च्या वतीने कोकणवाडी येथील मोटेगावकर याच्या आर्.सी.सी. शिकवणीवर्गासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रतिकात्मक स्वरूपात या शिकवणीवर्गाच्या फलकांवर काळे फासण्यात आले.