लातूर येथील आर्.सी.सी. शिकवणीवर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला अटक

  • ‘नीट’ परीक्षा महाघोटाळा प्रकरण

  • परीक्षेच्या १० दिवस आधीच मिळवली प्रश्नपत्रिका !

लातूर – ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने येथील नामांकित ‘रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस’ (आर्.सी.सी.) शिकवणीवर्गाचा संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याची ११ घंटे प्रदीर्घ चौकशी करून त्याला अटक केली. ३ मे या दिवशीच्या ‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका मोटेगावकर याने १० दिवस आधी म्हणजे २३ एप्रिल या दिवशी मिळवली होती.

अन्वेषणाच्या वेळी त्याच्या भ्रमणभाषमध्ये ‘नीट’ची मूळ प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आढळून आली. त्याने ही प्रश्नपत्रिका विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला आणि काही विशेष विद्यार्थ्यांना पाठवली होती. १४ मे या दिवशी लातूर येथील त्याच्या निवासस्थानी धाड घालण्यात आली होती. परीक्षा संपताच त्याने भ्रमणभाषमधील सर्व तांत्रिक पुरावे आणि माहिती पुसून टाकली होती. सध्या तो लाभार्थी विद्यार्थ्यांची नावे सांगण्यास टाळाटाळ करत आहे.

सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओमध्ये मोटेगावकर विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना दिसत आहे.

कोण आहे प्रा. शिवराज मोटेगावकर ?

शिवराज मोटेगावकर शिक्षणक्षेत्रात ‘एम्. सर’ म्हणून ओळखला जातो. वर्ष १९९९ मध्ये त्याने अवघ्या १० विद्यार्थ्यांसह शिकवणीवर्गाला प्रारंभ केला होता. नंतर हा शिकवणी वर्ग ‘आर्.सी.सी.’ नावाने प्रसिद्ध झाला.

संपादकीय भूमिका

शिक्षणक्षेत्राला कलंक ठरणार्‍या अशा महाठगांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा देऊन त्यांच्याकडून सव्याज दंडवसुलीही करायला हवी !