सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष एस्.टी.ने, तर उपाध्यक्ष सायकलवरून जिल्हा परिषदेत जाणार !

पंतप्रधानांच्या आवाहनाला सोलापूर जिल्हा परिषदेचा प्रतिसाद !

सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषदेकडून प्रत्येक सोमवारी पेट्रोल-डिझेलवरील वाहनांचा वापर टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असा निर्णय घेणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.

या निर्णयानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. दीपक वैद्य हे एस्.टी.ने, तर उपाध्यक्ष श्री. इंद्रजित पवार हे सायकलवरून जिल्हा परिषदेत येणार आहेत, तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील अधिकारी-कर्मचारी यांनीही सोमवारी खासगी वाहनांचा वापर टाळण्याचे निश्चित केले आहे. यासाठी परिपत्रक काढून कर्मचार्‍यांसाठी हा निर्णय अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष श्री. दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष श्री. इंद्रजित पवार यांनी दिली. नागरिकांसाठी मात्र कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही.