मी करत असलेले धर्मकार्य खटकणार्‍यांकडून माझ्याविरुद्ध षड्यंत्र, माझ्यावरील आरोप पूर्णपणे तथ्यहीन ! – ह.भ.प. श्याम महाराज राठोड

  • आळंदी (पुणे) येथे श्याम महाराज राठोड यांच्यासह ७ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप !

  • लवांडे प्रकरणामुळे आरोप करण्यात आल्याचे श्याम महाराजांचे म्हणणे !

ह.भ.प. श्याम महाराज राठोड

पुणे – माझ्यावर करण्यात आलेला आरोप पूर्णपणे बिनबुडाचा असून मी त्याचे खंडन करतो. प्रथम माहिती अहवाला (एफ्.आय.आर्.) मध्ये माझे नाव नाही, तसेच घटनेचा कोणताही ठोस वेळ किंवा काळ नमूद केलेला नाही. लवांडे प्रकरणामुळे माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. केवळ धर्मकार्य खटकत असल्याने माझ्याविरुद्ध हे षड्यंत्र रचले जात आहे, असे वक्तव्य ह.भ.प. श्याम महाराज राठोड यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड येथील दिघी पोलीस ठाण्याच्या सीमेत एका महिलेने केलेल्या सामूहिक अत्याचाराच्या दाव्यानंतर श्याम महाराज यांनी स्वत:ची बाजू मांडली.

ते पुढे म्हणाले की, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सर्वांचे सी.डी.आर्. (संपर्कांचा तपशील) पडताळले जावेत. मी एक संन्यासी असून धर्माचे कार्य करत आहे. काही सुपारीबाज पत्रकार आणि धर्मविरोधी लोक खोट्या बातम्यांच्या आधारे आसुरी आनंद घेत आहेत. माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. पिंपरी-चिंचवड येथील दिघी पोलीस ठाण्याच्या परिसरात श्याम महाराज राठोड यांच्यासह ७ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. श्याम महाराज राठोड यांनी हा आरोप फेटाळले आहे.

संपादकीय भूमिका

गेल्या काही वर्षांपासून हिंदुत्वाचे कार्य करणारे संत आणि महाराज यांना खोट्या प्रकरणांत अडकवून त्यांची अपकीर्ती करण्याचे प्रकार वाढले आहेत. हिंदुत्वनिष्ठ शासनाने या प्रकरणाचे सत्य जनतेसमोर आणून या षड्यंत्रामागे कुणाचा हात आहे ?, हे जनतेसमोर आणणे आवश्यक आहे !