डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसराच्या सुशोभीकरणास महापालिकेची संमती !

डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक

पुणे – डेक्कन जिमखाना परिसरातील ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरा’च्या सुशोभीकरणासाठी महापालिकेने संमती दिली आहे. दगडी मेघडंबरी उभारणे, भुयारी मार्गाचे सुशोभीकरण, परिसर विकासाची कामे यांमध्ये करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी दिली. महापालिकेचा भवन विभाग हे काम करणार आहे. या कामासाठी महापालिकेने ३ कोटी १२ लाख २३ सहस्र रुपयांचे पूर्वगणनपत्रक सिद्ध केले होते.

तांत्रिक छाननी समितीने या अंदाजपत्रकाला संमती दिली. त्यानंतर २ कोटी ६३ लाख ९४ सहस्र रुपयांच्या निविदा प्रक्रिया राबवून हे काम देण्यात आले. डेक्कन परिसराला पुण्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन सुशोभीकरणाचे काम होणार आहे. या स्मारकाचे जतन करणे, परिसराचा विकास करणे ही काळाची आवश्यकता आहे, अशी माहिती श्रीनाथ भीमाले यांनी दिली.