वाघोली (पुणे) येथे मॅफेड्रॉनचा कारखाना उघडण्याचा कट उधळला !

प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे – केसनंद येथील जोगेश्वरी वजनकाटा परिसरातून पोलिसांनी अनिस सय्यद आणि हरि उफाडे यांना ५ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम्.डी.) सह कह्यात घेतले होते. या गुन्ह्याचे अन्वेषण करतांना सुमीत घुले हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे समजताच तो पसार झाला; मात्र पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून त्याला कर्णावती (अहमदाबाद) येथून अटक केली. या प्रकरणी सोन्याबापू होले, राम यनभर, रामनिवास बिश्नोई, आकाश ढवळे आणि बिपीनकुमार पंडित यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी सुमीत घुले आकाश ढवळेच्या साहाय्याने पुणे शहर आणि ग्रामीण भागात अमली पदार्थांची विक्री करत होता. कुरकुंभ अमली पदार्थ प्रकरणातील आरोपी बिपीनकुमार पंडित हा सध्या जामिनावर बाहेर होता. (अशा गुन्हेगारांना जामीन न मिळण्याचे प्रावधान हवे ! – संपादक) त्याच्या साहाय्याने ग्रामीण भागात कारखाना चालू करण्याची या टोळीची सिद्धता चालू होती. आरोपींकडून ४६ लाख ६० सहस्र रुपये किमतीचे २२५ ग्रॅम मॅफेड्रॉन आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या अलिशान गाड्या पोलिसांनी कह्यात घेतल्या आहेत.