California Mayor : आर्केडिया (अमेरिका) शहराच्या महापौर चीनसाठी करत होत्या हेरगिरी !

आर्केडिया शहराच्या महापौर इलिग वांग

वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने (एफ्.बी.आय. – मध्यवर्ती अन्वेषण विभागाने) सांगितले की, कॅलिफोर्नियातील आर्केडिया शहराच्या महापौर इलिग वांग (वय ५८ वर्षे) यांच्यावर चीनच्या हस्तक म्हणून काम केल्याचा आरोप मध्यवर्ती न्यायालयात करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

एफ्.बी.आय.च्या मते, वर्ष २०२० चा शेवट ते २०२२ पर्यंत इलिग वांग यांनी चिनी सरकारी अधिकारी सांगतील, तसे काम केले. त्यांनी अमेरिकेत चीनच्या हितसंबंधांना चालना देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यांनी ‘यूएस् न्यूज सेंटर’ नावाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून अमेरिकेत चीनच्या समर्थनार्थ प्रचार केला. हे संकेतस्थळ  स्वतःला स्थानिक चिनी-अमेरिकी समुदायासाठी बातम्यांचे स्रोत असल्याचे सांगत असे. प्रत्यक्षात वांग आणि त्यांचे सहकारी चिनी अधिकार्‍यांकडून सूचना घेत असत आणि संकेतस्थळावर त्यांच्या आवडीनुसार मजकूर प्रसारित करत असत.