शहरातील ६७३ टँकरचे ‘फिटनेस’ प्रमाणपत्र कालबाह्य !

पुणे – उन्हाळ्यामुळे शहरात पाणीपुरवठा करणार्‍या टँकरची मोठी वर्दळ असते; मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माहिती अन्वये ४ सहस्र ३८६ नोंदणीकृत टँकरपैकी ६७३ टँकरचे ‘फिटनेस’ प्रमाणपत्र कालबाह्य झाले आहे. हे टँकर तांत्रिकदृष्ट्या रस्त्यावर धावण्यासाठी अपात्र आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून फिटनेस पडताळणी करतांना वाहनाच्या तांत्रिक गोष्टी म्हणजेच टायर आणि ब्रेक यांची स्थिती, रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी असणार्‍या ‘रिफ्लेक्टर्स’ आणि दिव्यांची स्थिती, इंजिन क्षमता, प्रदूषण नियंत्रण मानके यांसह टँकरचा आकार किंवा उंची बेकायदेशीरपणे वाढवली आहे का ? याची पडताळणी केली जाते. यासह चालकाचा परवाना, विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र यांची वैधताही पडताळली जाते. प्रशासनाने आवाहन करूनही अनेक टँकरचालकांनी फिटनेस पडताळणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अशा टँकरवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पथके सिद्ध केली आहेत. वाहनधारकांनी दंड आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी वाहनांची फिटनेस पडताळणी वेळेत करून घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांनी केले.

संपादकीय भूमिका

टँकर चालक आणि मालक यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत. यासाठी कठोर उपाययोजनांसह त्यांच्यावर कारवाई होणेही आवश्यकच आहे !