पाकिस्तानी गुंडांच्या संपर्कात असणाऱ्या २ आतंकवाद्यांना उत्तरप्रदेशातून अटक

  • पाकिस्तानी गुंडांच्या होते संपर्कात

  • संवेदनशील ठिकाणांवर करणार होते घातपात

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने दानियान अशरफ  आणि कृष्णा मिश्रा या २ आतंकवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक देशी पिस्तूल, एक गावडी पिस्तूल, ६ जिवंत काडतुसे आणि २ भ्रमणभाष संच जप्त करण्यात आले आहेत. हे आतंकवादी देशातील संवेदनशील ठिकाणांवर साखळी बाँबस्फोट आणि पोलीस पथक यांच्यावर आक्रमणाचा कट रचत होते. दोघेही पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी, आबिद जट आणि हम्माद यांच्या संपर्कात होते. चौकशीत या आतंकवाद्यांनी सांगितले की, शहजाद भट्टी म्हणाला होता, ‘माझ्या सांगण्यानुसार काम केले, तर मी तुम्हाला भारतात हिरो बनवीन.’

गुंड शहजाद भट्टी, आबिद जट आणि हम्माद यांच्या निर्देशानुसार या तरुणांना श्रीमंत होण्याचे आमीष दाखवून कट्टरतावादी बनवले जात होते. त्यांचा उद्देश संवेदनशील संस्था, पोलीस ठाणी, चौक्या आणि पोलीस यांच्यावर आक्रमण करून देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणणे हा होता.

सामाजिक माध्यमांचा वापर करून आतंकवादी निर्माण करण्याचे षड्यंत्र

आतंकवादविरोधी पथकाच्या प्रवक्त्याने सांगितले की, पाकिस्तानी आतंकवादी संघटना सामाजिक माध्यमे, विशेषतः इन्स्टाग्रामद्वारे भारतीय तरुणांना ‘फुट सोल्जर’ (अशा व्यक्ती ज्या भूमीवर प्रत्यक्ष उतरून एखादे काम किंवा योजना अंमलात आणतात; कोणत्याही संघटनेचे किंवा मोहिमेचे सर्वांत खालच्या स्तरावर काम करणारे सक्रीय कार्यकर्ते) आणि ‘स्लीपर सेल’ (छुप्या पद्धतीने आतंकवाद्यांना साहाय्य करणारे धर्मांधांचे स्थानिक गट) म्हणून भरती करत असल्याची माहिती मिळाली होती.

चौकशीत असे समोर आले की, आरोपी दानियाल आणि कृष्णा पाकिस्तानी ‘हँडलर्स’च्या (भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी नियंत्रण आणि संचालन करणारे लोक) संपर्कात होते. त्यांच्या भ्रमणभाष संचामध्ये शहजाद भट्टी, आबिद जट आणि हम्माद यांचे संपर्क क्रमांक होते. त्यांच्याकडून व्हिडिओ कॉल, व्हॉइस नोट्स, व्हॉट्सॲप चॅट आणि देशविरोधी संवाद यांचे पुरावे मिळाले आहेत.

दानियालने बंदुकीची मागणी केली, कृष्णाला खून करण्याचे काम मिळाले

दानियाल अशरफने एका राज्याच्या पोलीस ठाण्याचा व्हिडिओ बनवून हँडलर्सना पाठवला होता. त्याने आक्रमणासाठी पैसे आणि शस्त्रे (बंदूक) यांची मागणीही केली होती. हम्माद याने आबिद जट याचा ‘पाकिस्तानी डॉन’ (प्रमुख गुंड) असे लिहिलेले छायाचित्र  पाठवले होते, ज्याच्या ५० प्रती छापून महत्त्वाच्या ठिकाणी चिकटवण्यास सांगितले होते. कृष्णा मिश्रा याच्या भ्रमणभाष संचामध्ये शहजाद भट्टी आणि आबिद जट याचे व्हिडिओ सापडले, ज्यात एखाद्या वर्दीधारी व्यक्तीला गोळी मारून व्हिडिओ पाठवण्याचे काम दिले होते.

२ महिन्यांत १२ आतंकवादी पकडले गेले

गेल्या दोन महिन्यांत उत्तरप्रदेशामध्ये १२ आतंकवाद्यांना पकडण्यात आले आहे. ४ एप्रिलला लक्ष्मणपुरी येथे ४ जणांना पकडण्यात आले होते. त्यांना पाकिस्तानकडून सांगण्यात आले होते की, तुम्ही दहशत पसरवा, तुम्ही जेवढी दहशत पसरवाल, तेवढे पैसे तुम्हाला मिळतील. मोठ्या स्फोटाच्या सिद्धतेत चारही आतंकवाद्यांनी पिकअप गाडी आणि मोटारसायकल यांना आग लावून सराव केला. याचे व्हिडिओ पाकिस्तानी हँडलर अबू बकर याला पाठवले होते. त्या बदल्यात त्यांना आग लावण्याच्या प्रत्येक कृत्यावर १२ सहस्र रुपये मिळत होते.

संपादकीय भूमिका

अशांना कारागृहात ठेवून पोसत रहाण्यापेक्षा त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून तात्काळ फाशी दिली पाहिजे !