Undercover Female Cop Harassed : साध्या वेशात उभ्या राहिलेल्या महिला पोलीस आयुक्तांना ३ घंट्यांत ४० पुरुषांनी छेडण्याचा केला प्रयत्न !

मलकाजगिरी (तेलंगाणा) शहरातील महिलांची असुरक्षितता दर्शवणारे भयावह वास्तव समोर !

भाग्यनगर (तेलंगाणा) – महिलांच्या सुरक्षेविषयीचे दावे प्रत्यक्ष किती खरे आहेत, हे तपासण्यासाठी मलकाजगिरीच्या पोलीस आयुक्त सुमती यांनी एक अत्यंत अनोखा प्रयोग केला. त्या साध्या वेशात सुरक्षारक्षकांविना मध्यरात्री १२.३० ते पहाटे ३.३० या वेळेत बसस्थानकावर सामान्य महिलेसारख्या उभ्या राहिल्या. अवघ्या ३ घंट्यांत ४० पुरुषांनी त्यांना छेडले. या प्रकारामुळे शहरात महिला किती असुरक्षित आहेत, याचे भयावह वास्तव समोर आले आहे.

छेडणार्‍यांमध्ये शिकलेले तरुण, विद्यार्थी आणि नामांकित आस्थापनाचे कर्मचारी !

हे पुरुष केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचे नव्हते, तर त्यात शिकलेले तरुण, विद्यार्थी आणि नामांकित आस्थापने यांमध्ये काम करणारे कर्मचारीही होते. यातील अनेक जण दारूच्या नशेत होते, तर काही जणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचा संशय आहे. समोर उभी असलेली स्त्री ही एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे, याची कल्पनाही त्यांना नव्हती.

आरोपींना पकडून कुटुंबियांसमोर कडक शब्दांत केले समुपदेशन !

या मोहिमेनंतर पोलिसांनी या सर्व ४० व्यक्तींची ओळख पटवून त्यांना कह्यात घेतले. या आरोपींच्या विरोधात गुन्हे न नोंदवता पोलीस प्रशासनाने एक वेगळा मार्ग निवडला. या सर्वांना त्यांच्या कुटुंबियांसमक्ष बोलावून त्यांचे कडक शब्दांत समुपदेशन करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी महिलांशी कसे वागावे, याचे धडे देत त्यांना अंतिम चेतावणी देण्यात आली.

संपादकीय भूमिका

  • समाजाची नीतीमत्ता किती खालावली आहे, हेच यातून दिसून येते. यातून समाजाला धर्मशिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित होते !
  • असे प्रयोग देशाच्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कक्षेत करणे आवश्यक आहे. त्यातून समाजात वचक निर्माण होईल !