नाशिक गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठिकाण असून उद्योग, व्यवसाय यांना प्रोत्साहित करणार !

  • ‘कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदे’त मान्यवरांचे आश्वासन !

  • कुंभपर्वाच्या कालावधीत २५ सहस्र कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता !

नाशिक – नाशिक ही मंत्र, तंत्र आणि यंत्र यांची भूमी आहे. या भूमीत उद्योग, तसेच व्यवसाय यांना आवश्यक घटक उपलब्ध आहेत. त्यातच पुढील वर्षी कुंभमेळा आहे. त्यामुळे आगामी काळात नाशिक हे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठिकाण ठरणार आहे. त्यासाठी नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, नाशिक महानगरपालिका आणि नाशिक जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करतील, अशी ग्वाही ‘कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदे’च्या व्यासपिठावरून देण्यात आली आहे. या वेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

या वेळी ‘नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणा’चे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘‘आगामी कुंभपर्वाच्या यशस्वीतेसाठी सामूहिक सहकार्य आवश्यक आहे. कुंभसाठी येणार्‍या भाविकांचे समाधान होईल, असेच नियोजन करण्यात आले आहे. कुंभमेळ्यासाठी ‘प्राधिकरणा’ची स्थापना करण्यात आली आहे. कुंभच्या कालावधीत मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. नाशिक येथे साधूग्रामसाठी १सहस्र ४५० एकर, तर त्र्यंबकेश्वर येथे ६५० एकर जागेचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी

१० नवीन घाट बांधण्यात येत आहेत. स्वच्छ आणि अपघातविरहित सुरक्षित कुंभमेळ्याचे नियोजन केले आहे. या कालावधीत किमान २५ सहस्र कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे.’’