काँग्रेसचे गिरीश चोडणकर आणि वॉरन आलेमाव यांची चौकशी

‘हिंदू एकता मंच’च्या पणजी येथील ‘आक्रोश सभे’चे फलित

अधिवक्ता गोविंद शिरोडकर यांच्यावर गुन्हा नोंद

पणजी, ३ मे (वार्ता.) – हिंदु देवतांचे विडंबन करणार्‍यांना त्वरित कह्यात घेण्याच्या मागणीवरून राज्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘हिंदू एकता मंच’ या बॅनरखाली संघटित होऊन २ मे या दिवशी सायंकाळी पणजी येथे ‘आक्रोश सभे’चे आयोजन केले होते. हिंदु देवतांचे विडंबन करणार्‍यांना त्वरित कह्यात न घेतल्यास’उग्र आंदोलन करण्याची चेतावणी या सभेच्या माध्यमातून देण्यात आली होती. या आंदोलनानंतर सामाजिक कार्यकर्ते तथा अधिवक्ता गोविंद शिरोडकर यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तर म्हापसा पोलिसांनी काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांना पोलीस ठाण्यात बोलावून प्रकरणाच्या अन्वेेषणाला प्रारंभ केला आहे. त्याचप्रमाणे पणजी पोलिसांनी नेते वॉरन आलेमाव यांनाही पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे २ घंटे अन्वेेषण केले.

अधिवक्ता गोविंद शिरोडकर यांच्या विरोधात म्हापसा येथे गुन्हा नोंद : अन्वेेषणासाठी पोलीस ठाण्यात बोलावले

चिंबल येथील सामाजिक कार्यकर्ते तथा अधिवक्ता गोविंद शिरोडकर यांनी सामाजिक माध्यमातून प्रसारित झालेल्या एका भाषणातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम १९६ आणि २९९ अंतर्गत गुन्हा नोंद झालेला आहे अन् पोलिसांनी अधिवक्ता गोविंद शिरोडकर यांना अन्वेषणासाठी नोटीसही पाठवली आहे. ‘जुने गोवे येथील फ्रान्सिस झेविअर’ आणि गोमंतकीय यांचा ‘डी.एन्.ए.’ एकच आहे’, असे वादग्रस्त विधान अधिवक्ता गोविंद शिरोडकर यांनी केले होते. या प्रकरणी खोर्ली, म्हापसा येथील सूजन नाईक यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी अधिवक्ता गोविंद शिरोडकर यांना अन्वेेषणासाठी पोलीस ठाण्यात बोलावले आहे.

पणजी पोलिसांकडून वॉरन आलेमाव यांचे २ घंटे अन्वेषण : ४ मे या दिवशी पुन्हा अन्वेषणासाठी बोलावले

वॉरन आलेमाव यांनी सनातन धर्माचा अवमान केल्याची तक्रार ‘करणी सेने’चे संतोष राजपूत यांनी पणजी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. या तक्रारीच्या पार्श्‍वभूमीवर पणजी पोलिसांनी वॉरन आलेमाव यांच्या विरोधात २ मे या दिवशी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी ३ मे या दिवशी वॉरन आलेमाव यांना दुपारी अन्वेषणासाठी बोलावले होते. पोलिसांनी वॉरन आलेमाव यांचे पोलीस ठाण्यात सुमारे २ घंटे अन्वेेषण केले. अन्वेषणाच्या वेळी वॉरन आलेमाव यांनी आपण सनातन धर्माच्या विरोधात विधान न केल्याचा दावा केला.

मी सनातन धर्माचा आदर करतो आणि धर्माचे कुणीही राजकारण करू नये ! – वॉरन आलेमाव

वॉरन आलेमाव पोलिसांना म्हणाले, ‘‘मी सनातन धर्माचा आदर करतो आणि धर्माचे कुणीही राजकारण करू नये. मी केलेल्या विधानाची व्हिडिओमध्ये चुकीची माहिती घुसडण्यात आली आहे. खर्‍या प्रकरणाकडून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे. प्रख्यात हिंदुत्वनिष्ठ लेखक, पत्रकार आणि यू ट्यूबर गौतम खट्टर यांना गोव्यात प्रवेश करण्यास बंदी घालावी. या प्रकरणी मी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार नाही. गोमंतकीय युवकांनी कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील, अशी विधाने करू नयेत, असे मी आवाहन करतो. युवकांनी गोव्यातील शांतता अबाधित ठेवावी आणि दायित्वाने वागावे.’’ पोलिसांनी वॉरन आलेमाव यांना ४ मे या दिवशी पुन्हा अन्वेषणासाठी बोलावले आहे.

म्हापसा पोलिसांकडून काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांचे ३ घंटे अन्वेषण

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राजकीय लाभासाठी एक ‘रिल’ (व्हिडिओ) बनवतांना ‘मा गंगा देवी आरती’च्या ध्वनीचा (ट्यूनचा) वापर करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ‘स्वराज्य गोमंतक संघटने’ने म्हापसा पोलीस ठाण्यात गिरीश चोडणकर यांच्या विरोधात २१ फेब्रुवारी २०२६ या दिवशी तक्रार नोंदवली होती. म्हापसा पोलिसांनी नेते गिरीश चोडणकर यांना ३ मे या दिवशी पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे ३ घंटे कसून अन्वेषण केले. म्हापसा पोलिसांनी अन्वेेषण केल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना गिरीश चोडणकर म्हणाले, ‘‘संपूर्ण प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित झालेले आहे. सरकारच्या विरोधातील सूत्रांवरून लोकांचे लक्ष विचलित करणे आणि आपला आवाज दडपणे यांसाठी माझ्यावर कारवाई केली जात आहे. वास्तविक ‘मांडवी नदीचे कॅसिनोमुळे प्रदूषण होत आहे’, हे सूत्र मांडण्यासाठी व्हिडिओ प्रसारित केला होता. यामध्ये कुठेही ‘गंगा आरती’ किंवा कोणत्याही धर्माचा अवमान केलेला नाही. पोलिसांनी माझी बाजू ऐकून न घेताच माझ्या विरोधात प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवला आहे. मी पोलीस अन्वेषणाला पूर्ण सहकार्य केलेले आहे आणि प्रत्येक प्रश्‍नाला सविस्तर उत्तर दिले आहे.’’


वॉरन आलेमाव याला वेगळी वागणूक का ? – विराज देसाई, गोवा विभाग समन्वयक, बजरंग दल

बजरंग दल

 पोलीस अधिकार्‍यांना निवेदन सादर करतांना बजरंग दलाचे कार्यकर्ते

पणजी – धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी यू ट्यूबर गौतम खट्टर यांना पोलीस कोठडीत ठेवून त्यांचे कसून अन्वेषण करण्यात आले होते. वॉरन आलेमाव यांच्यावरही सनातन धर्माचा अवमान केल्याचा, म्हणजे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. गौतम खट्टर आणि वॉरन आलेमाव यांच्यावरील आरोप एकाच स्वरूपाचे असतांना गौतम खट्टर यांच्या तुलनेत वॉरन आलेमाव यांना वेगळी वागणूक का दिली जात आहे ? सनातन धर्मावरील अवमान कुणीही सहन करणार नाही. वॉरन आलेमाव यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया बजरंग दलाचे गोवा विभाग समन्वयक विराज देसाई यांनी सामाजिक माध्यमाद्वारे व्यक्त केली आहे.

भगवान परशुराम यांचा अवमान  : वास्को येथे सेबी वाज याच्या विरोधात तक्रार

वास्को – ‘फेसबुक’वरून भगवान परशुराम यांचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणावरून वास्को पोलीस ठाण्यात सेबी वाज याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आला आहे. पोलीस ‘फेसबुक’वरून संबंधित माहितीचा अभ्यास करून पुढील कारवाई करणार आहेत.