कोंढवा (पुणे) येथील हिंदूंना शोधण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता ! – मंत्री नितेश राणे

  • भाजपचे पदाधिकारी सर्वेश मेहेंदळे यांना माझा पाठिंबा

  • कोंढव्यातील सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न

मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे

मुंबई – पुण्यातील कोंढवामध्ये आता हिंदूंना शोधण्यासाठी दुर्बिण लावावी लागत आहे. देशाला वर्ष २०४७ पर्यंत ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याच्या दृष्टीकोनातून काही शक्ती काम करत आहेत. या शक्तींनी काही विशिष्ट भागांवर स्वत:चे लक्ष केंद्रित केले असून त्यामध्ये पुण्यातील कोंढवा परिसराचा प्रामुख्याने समावेश आहे, असे वक्तव्य मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले.

मंत्री राणे पुढे म्हणाले, ‘‘तिथे सर्व काही ‘हिरवे’ करण्याचा प्रयत्न काही ‘हिरव्या सापांच्या’ माध्यमांतून होत आहे. माझ्या सहकार्‍याने हीच वस्तूस्थिती जनतेसमोर मांडली असून त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे.’’ राणे यांनी भाजपचे पदाधिकारी सर्वेश मेहेंदळे यांच्या एका व्हिडिओला पाठिंबा देतांना असे विधान केले आहे. भाजपचे पदाधिकारी  सर्वेश महेंदळे यांच्याविरुद्ध सामाजिक सलोखा बिघडवण्याचा ठपका ठेवत कोंढवा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेवरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

काय आहे प्रकरण ?

सर्वेश मेहेंदळे हे भाजप युवा मोर्चा पुणे शहराचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांनी कोंढव्यातील मुख्य रस्त्यावरील एका रुग्णालयाच्या इमारतीची एक चित्रफित सिद्ध केली. या चित्रफितीमधे ते रुग्णालयाच्या बाहेरील अतिक्रमणांविषयीची माहिती देत आहेत. ही माहिती देतांना त्यांनी या परिसराचा उल्लेख ‘पाकिस्तानातील कराची’ या शहराशी केला. त्यात ते ‘वेलकम टू कोंढवा ऑफ पाकिस्तान’, असा प्रारंभ करून ती चित्रफित त्यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली.