तळवडे (राजापूर) येथे पार पडले ‘विशाल हिंदु संमेलन’

डावीकडून सर्वश्री संतोष चव्हाण, दिलीप गोखले, लक्ष्मण शेरे, विनय पानवळकर आणि सौ. मनीषा सप्रे

पाचल, २७ एप्रिल (वार्ता.) – सकल हिंदु समाज, पाचल पंचक्रोशी आयोजित विशाल हिंदु संमेलन प्रभावती सभागृह, तळवडे येथे नुकतेच पार पडले. संमेलनाच्या प्रारंभी संमेलनाचे संयोजक ह.भ.प. लक्ष्मण शेरे यांनी हिंदूंमध्ये धार्मिकदृष्ट्या आलेली मरगळ दूर करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले.

मार्गदर्शन करतांना श्री. दिलीप गोखले म्हणाले की, आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जाती-पातींमध्ये विभागलेल्या हिंदूंनी हिंदू म्हणून एकत्र आले पाहिजे.  डॉ. मनीषा सप्रे यांनी ‘कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वबोध, नागरी शिष्टाचार आणि समरसता’ या पंचसूत्रीचे आचरण करावे, असे आवाहन हिंदूंना केले.

श्री. विनय पानवळकर म्हणाले की, राष्ट्र-धर्माच्या दु:स्थितीचे मुख्य कारण म्हणजे हिंदूमधील धर्मशिक्षणाचा अभाव ! त्यासाठी हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षणवर्ग घेते. हे वर्ग आपापल्या गावांत चालू करावेत, असेही आवाहन श्री. पानवळकर यांनी केले.

या वेळी संमेलनाचे सहसंयोजक ह.भ.प. संतोष चव्हाण यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले.