ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकाचे वाचन हिंदुत्वनिष्ठांनी बंद पाडले !

‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकाचे वाचन करण्यासाठी खाली बसलेल्या पुरोगाम्यांना थांबवतांना हिंदुत्वनिष्ठ

ईश्वरपूर (जिल्हा सांगली), २६ एप्रिल (वार्ता.) – येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर २५ एप्रिल या दिवशी पुरोगामी संघटनांच्या वतीने कॉ. गोविंद पानसरे लिखित आणि अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकाच्या वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची माहिती मिळताच परिसरातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमस्थळी एकत्र झाले आणि त्यांनी या वाचनाला प्रखर विरोध दर्शवला. यामुळे निर्माण झालेला तणाव पाहून पोलिसांनी मध्यस्थी केली आणि शेवटी हा कार्यक्रम बंद पाडण्यात आला.

या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी आक्रमक पवित्रा घेत विचारले की, महाराजांच्या पुतळ्यासमोर अशा चुकीच्या इतिहासाचे वाचन करून धार्मिक आणि सामाजिक सलोखा का बिघडवला जात आहे ? या वेळी दोन्ही गटांत वादावादी झाली. हिंदुत्वनिष्ठांचा वाढता विरोध पाहून पोलिसांनी हस्तक्षेप केला. शेवटी पुरोगामी कार्यकर्त्यांना वाचन थांबवावे लागले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री अविनाश जाधव, शेखर खांडेकर, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री प्रवीण परीट, अमोल ठाणेकर, अक्षय पाटील, बबलू जाधव आदीसह धारकरी उपस्थित होते.

पुरोगामी संघटनांच्या वतीने कॉ. धनाजी गुरव, संजय बनसोडे, प्रा. शामराव पाटील, शाकीर तांबोळी, डॉ. सुदाम माने, डॉ. काशिलिंग गावडे, अजित हवलदार, उमेश शेवाळे, प्रा. बी.आर्.जाधव आदी उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

छत्रपती शिवाजी महाराज हिंदु समाजाचे आराध्यदैवत आहेत. ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकातून महाराजांच्या दैदीप्यमान इतिहासाला संकुचित करण्याचा आणि त्यांच्या आध्यात्मिक पैलूंकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाल्याची टीका वारंवार होत आहे. अशा वादग्रस्त साहित्याचे सार्वजनिक ठिकाणी वाचन करून पुरोगामी मंडळींना नेमके काय साध्य करायचे आहे ?