भारताचे विश्वगुरु म्हणून पुनरुत्थान होणे निश्चित ! – RSS Chief Mohan Bhagwat

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

नागपूर – भारत निश्चितच विश्वगुरु बनेल, याविषयी कुणालाही शंका नसावी. एक काळ असा होता, जेव्हा लोक अयोध्येत भव्य श्रीराममंदिराच्या निर्मितीविषयी शंका उपस्थित करत होते. मंदिर बनणे अशक्य मानत होते; पण आज ते मंदिर सर्वांसमोर साक्षात् उभे आहे. त्याचप्रमाणे भारताचे विश्वगुरु म्हणून पुनरुत्थानही पूर्णपणे निश्चित आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. येथील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ परिसरात उभारल्या जाणार्‍या ‘भारत दुर्गा शक्ती स्थळ’ मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज, स्वामी मित्रानंदजी महाराज, साध्वी ऋतंभरा आणि धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यासह अनेक धार्मिक नेते उपस्थित होते.

प.पू. सरसंघचालक पुढे म्हणाले,

१. देशाच्या भविष्याविषयी शंका ठेवू नका. धैर्यासह आत्मनिर्भरतेने जीवन जगा.

२. जर लोकांनी संकल्पाप्रमाणे वाटचाल केली, तर भारत आणखी सशक्त होईल.

३. भारताचे विश्वगुरु बनण्याचे स्वप्न निरंतर प्रयत्न आणि सामूहिक शिस्त यांद्वारे साकार होईल.

. भारताला खर्‍या अर्थाने समजून घ्यायचे असेल, तर त्याला स्वतःची संस्कृती आणि सनातन मूल्ये यांच्या दृष्टीकोनातून बघायला हवे. गेल्या १५० वर्षांत विकसित झालेल्या पाश्चात्त्य विचारांद्वारे भारताला समजून घेता येणार नाही. त्यासाठी परदेशी विचारसरणीचे थर प्रथम काढून टाकावे लागतील.

४ मुले जन्माला घालून त्यातील एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

भारतात कुठेही आपत्ती आली की, लोक जीव वाचवण्यासाठी पळतात; पण आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रत्येक कार्यकर्ता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत नाही, तर तो तेथे जाऊन लोकांचे प्राण वाचवतो.

त्यामुळे ४ मुले जन्माला घाला आणि त्यांतील एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या, म्हणजे ते इतरांचे प्राण वाचवण्यासाठी साहाय्य करू शकेल, असे विधान बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथील एका कार्यक्रमात केले. या वेळी प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत उपस्थित होते.