सावंतवाडी तालुक्याला सर्वाधिक फटका

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात २३ एप्रिल या दिवशी वादळी वार्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होणे, झाडे उन्मळून पडणे, घरांवरील कौले आणि पत्रे उडून जाणे असे प्रकार झाल्याने लाखो रुपयांच्या आर्थिक हानी झाली. यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. ‘पावसामुळे झालेल्या हानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाने हानीभरपाई द्यावी’, अशी मागणी केली जात आहे.
सावंतवाडी शहराला चक्रीवादळाचा फटका : ३० लाख रुपयांची हानी !
सावंतवाडी शहरात २१ ठिकाणी झाडे कोसळणे आणि घरांची पडझड होण्याचे प्रकार घडले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये श्री पंचम खेमराज (एस्.पी.) महाविद्यालयाची सर्वाधिक हानी झाली. वार्याचा वेग इतका प्रचंड होता की, महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीचे कौलारू छत पूर्णपणे विस्कळीत झाले, तर नवीन इमारतीवरील पत्रे कागदासारखे हवेत उडून दूरवर फेकले गेले. काही पत्रे तर ३ मजली इमारत ओलांडून महाविद्यालयाच्या मागील बाजूला जाऊन पडले. यावरून वार्याच्या वेगाची भीषणता लक्षात येते. रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्र्याचे छतही उडून थेट एस्.पी. महाविद्यालयाच्या परिसरात कोसळले. याखेरीज इमारतीच्या काचेच्या खिडक्या फुटून मोठी आर्थिक हानी झाली. या पावसामुळे सावंतवाडी शहरात ३० लाख रुपयांची हानी झाल्याचे प्राथमिक अनुमान आहे.
आमदार दीपक केसरकर आणि नगराध्यक्षा युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. हानीग्रस्तांना अधिकाधिक हानीभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उभयतांनी या वेळी सांगितले.
सावंतवाडी तालुक्यातील जनतेला असा बसला फटका !
१. सावंतवाडी तालुक्यात वेर्ले गावात वादळी वार्याने देऊळवाडी येथील रहिवासी सुरेश आत्माराम नाईक यांच्या घराची ४० सहस्र रुपयांची हानी झाली. फौजदारवाडी येथील अर्जुन रामा सावंत यांच्या मांगराचे (शेतघराचे) छत वार्याने उडून गेल्याने २० सहस्र रुपयांची हानी झाली.
२. देवसु परिसरात मंगेश धोंडी परब यांच्या घरावर मोठे झाड उन्मळून पडल्याने साडेपाच सहस्र रुपयांची हानी झाली.
३. माजगाव-नाईकवाडा येथील रहिवासी धनश्री गावकर यांच्या घरावर मध्यरात्री आंब्याचे मोठे झाड कोसळल्याने छताची हानी झाली.
४. देऊळवाडी, माडखोल येथील घरावर नारळाचे झाड कोसळून अजित लाड आणि त्यांची पत्नी सौ. तनु हे दोघे घायाळ झाले.
५. जाधववाडी, कारिवडे येथील मधुकर बाबुराव जाधव यांच्या घरावर झाड कोसळले. सुदैवाने या वेळी कुटुंबीय वाचले.
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
भाजपचे आमदार शंकर जगताप यांचे सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र