वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशाची प्रतिमा भेट देतांना सनातनचे साधक श्री. तुळशीदास गांजेकर आणि श्री. रघुवीर मडकईकर

सांखळी, २४ एप्रिल (वार्ता.) – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक जणांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या सांखळी येथील निवासस्थानी त्यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. वाढदिवसानिमित्त त्यांनी गृहनिर्माण वसाहत, हरवळे येथील सुभाषचंद्र बोस उद्यानात वृक्षारोपण केले. तत्पूर्वी त्यांनी जवळच्या श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.

तपोभूमी, कुंडई येथील सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी, नाणीज येथील जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्यासह गोव्यातील सत्ताधारी गटातील मंत्री, आमदार, राज्यातील उद्योजक आदी अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सनातन संस्थेच्या वतीने वाढदिवसानिमित्त सांखळी येथील साधक श्री. तुळशीदास गांजेकर आणि श्री. रघुवीर मडकईकर यांनी मुख्यमंत्र्यांची निवासस्थानी भेट घेऊन त्यांना सनातन संस्थेच्या वतीने शुभेच्छा देऊन सनातन-निर्मित श्री गणेशाच्या सात्त्विक चित्राची प्रतिमा भेट दिली.

सांखळी येथील रवींद्र भवनच्या विस्तारीकरण कामाची पायाभरणी

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते सांखळी येथील रवींद्र भवनमध्ये अधिकच्या सुविधा पुरवण्यासाठी करण्यात येणार्‍या विस्तारीकरणाच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. या विस्तारीकरणात ६०० आसनी वातानुकूलीन सभागृह, २०० आसनी ब्लॅक बॉक्स थिएटर आणि १ चित्रपटगृह यांचा समावेश आहे.

सांखळी येथे आयुर्वेद आरोग्य शिबिराचे लोकार्पण

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त ‘चेक्ड बाय डॉक्टर’ (आधुनिक वैद्यांनी पडताळलेले) या उपक्रमाखाली सांखळी येथील गोवा कॉलेज ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स येथे सकाळी बहुविशेषज्ञ आयुर्वेद शिबिराचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हेही उपस्थित होते. श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मडगाव येथेही अशाच प्रकारचे शिबिर दुपारी आयोजित करण्यात आले होते.