फसवणुकीच्या प्रकरणी मध्यप्रदेशात पकडलेल्या टोळीला पाकिस्तानातून मिळत होते आदेश

५० पेक्षा अधिक बँक खात्यांमधून पैसे हस्तांतरित

कोटा (राजस्थान) – येथील विज्ञान नगर पोलीस ठाण्यात ८ डिसेंबर २०२५ या दिवशी ४३ लाख ५० हजार रुपयांच्या फसवणुकीच्या संदर्भात तक्रार प्रविष्ट (दाखल) झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी १६ एप्रिल या दिवशी अमजद आणि त्याच्या ३ साथीदारांना भोपाळमधून अटक केली. मुख्य सूत्रधार अमजद याला पाकिस्तानमधील ‘हँडलर’कडून (आतंकवाद्यांना आदेश देणारे) आदेश येत होते. अमजदचे साथीदार त्याला बँक खाती उपलब्ध करून देत होते. यासाठी त्यांना दलाली मिळत असे. या खात्यांमध्ये फसवणुकीचे पैसे हस्तांतरित केले जात होते. अमजद अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून अनुमाने दीड वर्षांपासून या कारवायांत गुंतला आहे.

सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सतीशचंद्र यांनी सांगितले की, अमजद याने सर्वांत आधी आसपास रहाणार्‍या आणि काम करणार्‍या कामगारांना लक्ष्य केले. त्यांच्या बँक खात्यांचा वापर फसवणुकीचे पैसे हस्तांतरित करण्यासाठी करण्यात आला. अमजद त्याच्या दीपक, राहुल आणि विजय या साथीदारांसमवेत संपूर्ण जाळे चालवत होता. प्रत्येक सदस्याला एक खाते उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात ७ सहस्र रुपये देत असे.

ते खात्यासमवेत खातेक्रमांकाशी संबंधित सिम, एटीएम, बँक पासबुक (संपूर्ण किट) देखील घेत असे. नंतर काम झाल्यावर खातेधारकाला परत करत असे. पोलिसांना अशा ५० हूनजास्त खात्यांची माहिती मिळाली आहे. यांच्या माध्यमातून फसवणुकीची रक्कम ऑनलाईन आणि रोख रक्कम यांद्वारे हस्तांतरित केली गेली होती. यानंतर अमजद आणि त्याचा पाकिस्तानी ‘हँडलर’ या खात्यांमधून पैसे स्वतःच्या आणि इतर वेगवेगळ्या खात्यांमध्ये हस्तांतरित करत होते.