सर्व ठिकाणे आणि व्यक्ती यांना चैतन्यदायी नावे देऊन योग्य नामस्मरण अन् साधना करणे महत्त्वाचे !

‘१८.४.२०२६ या दिवशी मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार वाचले. त्यामध्ये ‘येणार्‍या ईश्वरी राज्यात सर्व ठिकाणची नावे चैतन्यदायी असतील !’, या मथळ्याखाली ‘ईश्वरी राज्यात घरे, उद्याने, रस्ते इत्यादी सर्व ठिकाणची राजकारणी, विदेशी आणि अन्य धर्मीय यांची नावे पालटली जातील; कारण त्यांच्यातून रज-तमाचे प्रक्षेपण होते. नवीन नावे राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी, संत आणि ऋषिमुनी यांची असतील. त्यांच्या नावातील चैतन्याने जनतेचे भले होईल.’ याविषयी गुरुकृपेने माझ्या मनात पुढील विचार आले.

पू. शिवाजी वटकर

१. नकळत घेतलेल्या भगवंताच्या नामाने अजामिळ ब्राह्मणाला चांगली गती मिळणे

‘श्रीमद्भागवत पुराणा’तील कथेनुसार ‘अजामिळ’ नावाचा एक ब्राह्मण होता. तो लहानपणापासून अत्यंत सदाचारी, धर्मनिष्ठ आणि वेदाध्ययन करणारा होता. आई-वडिलांची सेवा, यज्ञ-याग आणि भगवंताचे स्मरण हेच त्याचे जीवन होते. एकदा जंगलात जातांना त्याने एका दुष्ट स्त्रीला (वेश्येला) एका पुरुषासह रतिक्रीडा करतांना पाहिले. त्या दृश्यामुळे त्याच्या मनात वासना जागृत होऊन त्याचे अधःपतन झाले. तो त्या स्त्रीसह राहून पूर्णपणे अधर्माच्या मार्गावर गेला. अजामेळाला अनेक मुले झाली. त्याने सर्वांत लहान मुलाचे नाव ‘नारायण’ ठेवले. दिवसभर तो त्याला ‘नारायण, नारायण…’ अशी हाक मारत असे. अशा प्रकारे नकळत त्याच्या मुखातून भगवंताचे नाव सतत उच्चारले जात होते. जेव्हा अजामिळाचा मृत्यू जवळ आला, तेव्हा यमदूत त्याला घेण्यासाठी आले. भीतीने थरथर कापत असतांना त्याने त्याच्या मुलाला ‘नारायण’ अशी हाक मारली. हे ऐकल्यावर त्याला यमदूतांऐवजी विष्णुदूत घेऊन गेले. नकळत घेतलेले भगवंताचे नावही रक्षण करते. कोणताही मनुष्य कितीही पापी असला, तरी पश्चात्ताप आणि नामस्मरण यांनी तो मुक्त होऊ शकतो. ‘अन्ते मतिः सा गतिः ।’ (मृत्यूसमयी माणसाचे विचार जसे असतात, तशी त्याला पुढची गती मिळते), असे सुवचन आहे.

२. वरकरणी आणि फसवी साधना करणारा चतुर शेतकरी

चतुर नावाचा एक शेतकरी होता. त्याने अजामेळाची कथा ऐकली. त्याला वाटले की, शेवटच्या क्षणी देवाचे नाव घेतल्यावर मोक्ष मिळतो. त्यामुळे त्याने आपल्या मुलांची नावे वासुदेव आणि केशव अशी ठेवली. चुकीच्या समजुतीमुळे तो आयुष्यभर फसवणूक आणि भ्रष्टाचार करू लागला. जेव्हा त्याचा शेवट जवळ आला, तेव्हा तो ‘वा !, के !’ असे म्हणू लागला. त्याच्याजवळ उभे असलेल्या नातेवाईकांना वाटले की, तो वासुदेव, केशव असे देवाचे नाम घेत आहे; परंतु प्रत्यक्षात त्याचे लक्ष घरातील एका वासराकडे होते, जे केरसुणी खात होते. शेवटच्या क्षणी त्याच्या तोंडातून निघाले, ‘वासरू केरसुणी खात आहे !’, म्हणजे त्याच्या मनात भगवंताचे नाम नव्हते, तर स्वार्थी, सांसारिक आणि मायेतील विचार होते. त्यामुळे कर्मफलानुसार त्याला वाईट गती मिळाली.

३. प्रत्येक क्षणी भगवंताचे स्मरण ठेवणे आवश्यक !

जीवनाच्या शेवटी तेच आठवते, जे आयुष्यभर मनात साठवलेले असते; म्हणून केवळ शेवटच्या क्षणावर अवलंबून न रहाता सतत धर्माचरण, नामस्मरण आणि सत्कर्म करणे आवश्यक आहे. आपला प्रत्येक क्षण हा शेवटचा असू शकतो; म्हणून प्रत्येक क्षणी भगवंताचे स्मरण ठेवणे, हाच खरा साधनेचा मार्ग आहे.

४. सर्व ठिकाणे आणि व्यक्ती यांना चैतन्यदायी नावे देऊन योग्य रितीने नामस्मरण अन् साधना करावी !

कलियुगातील भयंकर स्थितीत चतुरसारख्या लोकांकडून महापापे होत आहेत. ‘वरकरणी आणि फसवी साधना करून आपण स्वतःचे आणि समाजाचे कल्याण करत आहोत’, असा भ्रमही होत आहे. अशा स्थितीत केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासारखे अवतारी पुरुषच समाज, राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती सुधारू शकतात. हे लक्षात घेऊन भारतीय नागरिकांनी सनातन धर्म, संस्कृती, धर्माचरण आणि नैतिक मूल्ये यांचे पालन करून प्रत्येक कृती करावी. आपण मुले, घरे, उद्याने, रस्ते इत्यादींना चैतन्यदायी नावे द्यायला हवीत, जेणेकरून मुखातून वा कृतीतून भगवंताचे नाम अंतःकरणापासून घेतले जाईल.’

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.४.२०२६)