Lashkar-e-Taiba Terrorist : लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्याने जयपूरमध्ये ओळख पालटून निकाह केल्याचे उघड !

खोटा पासपोर्ट (पारपत्र) बनवून देशातून पलायन

(निकाह म्हणजे इस्लामनुसार विवाह)

जयपूर (राजस्थान) – लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी उमर हारिस उपाख्य ‘खरगोश’ याने ओळख पालटून जयपूरमध्ये निकाह केला होता. त्याने निकाहसाठी खोटी कागदपत्रे बनवून त्याआधारे भारतीय पासपोर्ट बनवला. नंतर तो देशातून पळून गेला. त्याने सौदी अरेबियामध्ये लपण्याचे ठिकाण बनवले असावे, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय आतंकवादी मॉड्यूलच्या (आतंकवादी कृत्यांचे नियोजन आणि त्याची कार्यवाही यांसाठी बनवलेल्या तुकडीच्या) अन्वेषणात हा प्रकार उघड झाला.

चौकशीत समोर आले की, उत्तर काश्मीर खोर्‍यात घुसखोरी करतांना आतंकवादी उमर हारिस हा बांदीपोरा आणि श्रीनगर येथील विविध ठिकाणी थांबला होता. एका मुलीशी त्याने जयपूरमध्ये सज्जाद हे खोटे नाव धारण करून निकाह केला. निकाहच्या कागदपत्रांचा वापर करून त्याने भारतीय पासपोर्ट मिळवला. अन्वेषण यंत्रणांच्या माहितीनुसार आतंकवादी उमर हारिस हा वर्ष २०१२ मध्ये पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करून आला होता. दीर्घकाळ सुरक्षा यंत्रणांपासून लपून त्याने खोर्‍यात स्वतःची पाळेमुळे घट्ट केली. त्याच्यातील ‘चपळाई’ आणि ठिकाणे पालटण्याच्या सवयी यांमुळे त्याला ‘खरगोश’ हे टोपण नाव देण्यात आले होते.

राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमध्ये पसरवले होते जाळे !

श्रीनगर पोलिसांनी उमर हारिसची माहिती केंद्रीय गुप्तचर संस्थांना दिली. यात सांगण्यात आले की, श्रीनगर पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या एका ‘मॉड्यूल’चा पर्दाफाश करून ५ संशयितांना पकडले. यात पाकिस्तानी आतंकवादी अब्दुल्ला उपाख्य अबू हुरैरा आणि उस्मान उपाख्य खुबैब यांचाही समावेश आहे. आतंकवादी अब्दुल्ला १६ वर्षांपासून फरार होता. चौकशीत अब्दुल्लाने स्वतःच्या आणि उमर हारिसच्या देशभरातील विशेषतः राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधील कारवायांविषयी माहिती यंत्रणांना दिली.

कागदपत्रे पडताळणीतील गंभीर त्रुटी उघड !

श्रीनगर पोलिसांनी या आंतरराष्ट्रीय आतंकवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केल्याने अनेक त्रुटी उघड झाल्या आहेत. ‘पोलीस पडताळणी प्रक्रिया अस्तित्वात असूनही राजस्थानमधील अधिकार्‍यांनी पासपोर्ट कसा दिला ?’, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

संपादकीय भूमिका

  • हे गुप्तचर यंत्रणांना अत्यंत लज्जास्पद ! याला उत्तरदायी कोण ?
  • आतंकवाद्याला खोटा पासपोर्ट बनवण्यास साहाय्य करणार्‍यांना फाशी द्या !