बायबल आणि कुराण यांतील भाकितांनुसार विनाशाचे संकेत !

इस्रायलमध्ये कावळ्यांच्या थव्यांनंतर मधमाशांचे आक्रमण

मधमाशांचे मोठे थवे

तेल अविव (इस्रायल) – दक्षिण इस्रायलमधील नेतिवोट शहरात मधमाशांचे मोठे थवे दिसून आले असून त्यांनी वाहने आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यावर आक्रमणे केली आहेत. यामुळे काही विमानांच्या उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी इस्रायली अधिकार्‍यांना विशेष पथके स्थापन करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सामाजिक माध्यमांवरील वापरकर्त्यांनी याकडे ‘अशुभ संकेत’ म्हणून पाहिले आहे. यापूर्वी तेल अविवमध्ये कावळ्यांचे मोठे थवे दिसले होते. काही वापरकर्त्यांचा दावा आहे की, हे विनाशाचे संकेत असून त्याचा उल्लेख बायबल आणि कुराण यांमध्ये आढळतो.

१. काही जण बायबलमधील ७:१८ या वचनाचा संदर्भ देत आहेत, ज्यात ‘नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशातून माशांना बोलावले जाईल’, असा उल्लेख असल्याचे सांगितले जाते.

२. भारतामधील एकाने ‘एक्स’वर इस्रायलमधील मधमाशांच्या आक्रमणाचा व्हिडिओ प्रसारित करत कुराणातील सूरह अल-अराफशी त्याचा संबंध जोडला आहे. यात हा अहंकारी आणि अपराधी लोकांसाठी संदेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.

३. गेल्या महिन्यात तेल अविव शहरावर सहस्रो कावळ्यांचे थवे घिरट्या घालतांना दिसले होते. इराणशी चालू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर याकडे विनाशाची चिन्हे म्हणून पाहिले गेले होते आणि त्याचा संबंध बायबलमधील वचनांशी जोडला गेला होता.