
कर्नाटक राज्याने मुलांचा भ्रमणभाष पहाण्याची वेळ केवळ १ घंटा केली आहे. डिजिटल व्यसनाच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी कर्नाटक सरकारने इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘डिजिटल’ वापरासंदर्भात महत्त्वाचे प्रारूप सिद्ध केले आहे. सरकारच्या मते २५ टक्के मुले या व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत. सरकारने नियम घातला आहे; पण त्याचे पालन मुलांकडून करून घेण्याचे दायित्व पालकांवर रहाणार आहे. मुलांना ही शिस्त लावणे, हे त्यांचेच दायित्व आहे. शाळेतूनही याविषयी प्रबोधन होणे आवश्यक आहे.
अनेक देशांमध्ये आज मुलांवर होणारे शारीरिक आणि मानसिक गंभीर परिणाम समोर आल्यामुळे कर्नाटक सरकारने उचललेले हे पाऊल देशासाठी केंद्र सरकारनेही उचलले पाहिजे. अनेक मुले खेळणे, अभ्यास करणे किंवा कुटुंबासह वेळ घालवणे यांऐवजी भ्रमणभाषवर व्हिडिओ, खेळ आदींमध्ये गुंतून रहातात. त्यामुळे त्यांचा मौल्यवान वेळ तर वाया जातोच आणि अभ्यासातील लक्षही न्यून होते. याखेरीज डोळ्यांवर ताण येतो आणि चिडचिड वाढते. आजच्या आधुनिक काळात भ्रमणभाष हा जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला असला, तरी लहान मुलांमध्ये त्याचा अतीवापर चिंतेचा विषय बनला आहे. लहान मुले भ्रमणभाष न मिळाल्यास डोके आपटून घेणे, हट्ट करणे, रागावणे, आरडाओरडा करणे आदी गोष्टी करतात. पालकांची मानसिकता बघून लाभ उठवतात, तसेच भ्रमणभाष न दिल्यास थोडी मोठी मुले ‘आत्महत्या करीन’, असेही पालकांना धमकावतात.

मुलांसाठी विशिष्ट वेळेनंतर काही ‘ॲप्स’ बंद करणे, शैक्षणिक नसलेल्या सामग्रीवर मर्यादा ठेवणे यांवर पालकांचे नियंत्रण सक्तीचे करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम मुलांसाठी भ्रमणभाष वापरण्याची निश्चित वेळ ठरवावी. अभ्यास, खेळ, वाचन, संगीत कला किंवा मैदानी उपक्रम यांकडे त्यांचे लक्ष वळवावे. पालकांनी स्वतःही भ्रमणभाषचा वापर मर्यादित करून आदर्श निर्माण करावा. मुलाशी संवाद वाढवून त्यांना प्रत्यक्ष खेळ आणि सर्जनशील कामांची आवड लावणे आवश्यक आहे; परंतु मुले पालकांचे अजिबात ऐकत नाहीत, ही पालकांची समस्या आहे; मात्र जी मुले नामजपासारखी साधना करतात किंवा बालसंस्कारवर्गाला जातात, अशा मुलांचे वर्तन वेगळे असते. त्यांना योग्य काय किंवा अयोग्य काय ? हे संस्कारवर्गातून शिकवल्यामुळे पालकांना साहाय्य होते, असे लक्षात येते. मुलांचे भविष्य निरोगी आणि सक्षम व्हावे, यांसाठी भ्रमणभाषचा योग्य वापर शिकवणे, ही काळाची आवश्यकता आहे. योग्य सवयी लावल्यास मुले नक्कीच सुधारू शकतात, यासाठी सरकारने पालकांच्या साहाय्याने त्वरित पावले उचलायला हवे !
– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा.
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !