‘ए.आय.एम्.आय.एम्.’च्या नगरसेविका सहर शेख यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट  

  • बनावट जातीचा दाखला मिळवल्याचे प्रकरण  

  • फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याची तक्रारदाराची मागणी

ठाणे – महानगरपालिका निवडणुकांच्या काळात मुंब्रा येथील ‘ए.आय.एम्.आय.एम्.’च्या (‘ऑल इंडिया मजेलिस ए इत्तेहादुल मुसलीमीन’च्या म्हणजे अखिल भारतीय मुस्लिम एकता संघाच्या) नगरसेविका सहर शेख यांनी अधिकार्‍यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवला, असा आरोप करत ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्दिकी अहमद यांनी सहर शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याविषयी तक्रार प्रविष्ट केली होती. ‘या प्रकरणाची सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात यावा’, अशी तक्रारदाराची मागणी आहे. सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेत यंत्रणांची दिशाभूल केल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे.

१. सहर यांचे वडील उत्तर प्रदेशातील गाजियाबादची मूळ रहिवासी युनूस इक्बाल शेख हे महाराष्ट्रात स्थलांतरित झाले.

२. स्थलांतरितांना नमुना १० लागू असतांना इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना ८ वापरून त्यांनी अधिकार्‍यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवला. त्यांच्या मुलीने जात प्रमाणपत्र घेत निवडणूक लढवून विजयी मिळवला.

३. ठाणे तहसीलदारांना प्राप्त तक्रारीनुसार १८ मार्च या दिवशी घेतलेल्या सुनावणीत आजाराचे कारण देत युनूस अनुपस्थित होते. सुनावणीस उपस्थित असलेल्या त्यांच्या अधिवक्त्यांनी जात दाखल्याची प्रत आणि काही कागदपत्रे दिली.

४.  २३ मार्चला पुन्हा सुनावणी घेण्यात आली, तेव्हा ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात प्रमाणपत्र दाखल्यामधील त्रुटी काढल्या.

अशांना पाकिस्तानात पाठवून द्या ! – नितेश राणे, मंत्री

नितेश राणे

या प्रकरणी भाजपचे मंत्री नितेश राणे म्हणाले, ‘‘हे लोक निवडणूक लढवतातच कसे ? हे बांगलादेशी आहेत का ? याचीही पडताळणी व्हायला हवी. हे लोक जिहादी मानसिकतेचे आहेत का ? ही पार्श्वभूमीही बघायला हवी. अशांना पाकिस्तानात पाठवून द्या.’’

संपादकीय भूमिका

धर्मांध कशा प्रकारे आरक्षण व्यवस्थेचा लाभ घेऊन निवडून येतात आणि जनतेची फसवणूक करतात, हे जाणा ! निवडणूक आयोग आणि ‘ए.आय.एम्.आय.एम्.’ पक्ष सहर शेख यांच्या विरोधात काय कारवाई करणार ?