विठ्ठलाची वारी करणार्यांचा संप्रदाय, म्हणजे वारकरी. ‘वैष्णव’, ‘माळकरी’, अशी नावे असलेला हा संप्रदाय भागवत धर्माखाली येतो. ‘विठ्ठल’ या लोकदैवताचे विष्णु हे वैदिकीकरण असल्याचे लेखक रा.चि. ढेरे, लेखिका दुर्गा भागवत वगैरे म्हणत असले, तरी ते तसे नाही; कारण त्यांचा हा सिद्धांत आर्य आक्रमणावर पूर्णपणे बेतलेला नसला, तरी साम्यवाद आणि समाजवाद यांनी पेरलेल्या वर्ग विभागणीत अन् वर्गसंघर्षात आहे. ते वेगळेपण मानल्यामुळे त्यांना समन्वयाचा सिद्धांत मांडावा लागतो. एकाच रूपाचे भिन्न ठिकाणी वेगवेगळे रूप असे ते मानायला सिद्ध नाहीत; कारण त्यांची वैचारिक बैठकच तशी नाही.

१. देवतांना बहुजनांशी जोडून इतरांना वेगळे किंवा आक्रमक ठरवण्याचा प्रयत्न
एकात्म तत्त्व, देवता विचार हा वेदांपासून आजपर्यंत एकसंध, अखंड आणि सातत्याने प्रवाही विचार आहे. ३३ प्रकारच्या निसर्गदेवतांमध्ये देवचार, क्षेत्रपाल, प्राणी, झाडे, पक्षी, वारूळ, मूर्ती सगळे येते. त्यात विठ्ठलही येतो आणि गोव्यातील सांतेरही येते. ‘विठ्ठल हा ‘बहुजनांचा देवू’ आहे’, असा विचार जेव्हा हे विचारवंत मांडतात, तेव्हा त्यांना विठ्ठलाशी काही देणे-घेणे नसते, त्याचा संबंध बहुजनांशी जोडून इतरांना वेगळे किंवा आक्रमक ठरवण्याचा असतो. ‘सांतेर असलेली शांतादुर्गा झाली हे लोकदैवतेचे, निसर्गदेवतेचे ‘ब्राह्मणीकरण’ आहे’, असा विचार मांडतात; पण खांडोळ्याच्या सांतेरीचे (वारुळाचे) मूर्तीरूप कुणी केले, याचे उत्तर मात्र देणे टाळतात. ते ब्राह्मणांनी केले नाही, तर तिला भजणार्या मूळ स्थानिकांनीच केले, हे ते सांगत नाहीत. एकाच शक्तीरूपाचे विविध प्रकारे झालेले प्रकटीकरण हे मान्य करावे लागते. तसे केले, तर पुरोगामी, समाजवादी आणि साम्यवादी वर्गसंघर्ष मांडता येत नाही.
२. वारकरी संप्रदायाकडून करण्यात येणारी वारी ‘विठ्ठल भेटी’साठीची आणि त्यात पुरोगाम्यांकडून होणारी घुसखोरी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी नुकतेच केलेले वक्तव्य हा त्याचाच पुढील भाग आहे. ‘वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाली आहे. वारकरी संप्रदायात ६० टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे’, असे जे शरद पवार म्हणत आहेत, त्या वारकरी संप्रदायाला पुरोगाम्यांशी काही देणे-घेणे नाही. वारकरी संप्रदाय हा पूर्णतः आस्तिक्यभावावर आणि विठ्ठल भक्तीवर आधारलेला आहे. वारीत चालणारा वारकरी सामाजिक पालटासाठी नाही, तर ‘विठ्ठल भेटी’साठी चालतो.
वारकरी संप्रदाय भक्तीमार्गी धार्मिक आणि प्रतिगामी यांचाच आहे. त्यात पुरोगामी घुसले आहेत. त्यासह समाजवादी, निधर्मी आणि साम्यवादी हे लोकही घुसले आहेत. हे लोक समता, समानता आणि सामाजिक सुधारणा यांच्या गप्पा करतात. अभंगांचे तोडून मोडून अर्थ सांगतात. गेल्या वर्षी ते ‘अल्ला देवे, अल्ला िपलावे’, असे म्हणण्याचे प्रकरणही असेच पुरोगामी घुसल्याचे ज्वलंत उदाहरण होते. अनेक साम्यवादी कीर्तनकार आणि प्रवचनकार (त्यांच्या सामाजिक माध्यमांच्या स्वतःच्या ओळखीमध्येही तसेच लिहिले होते) समता अन् समानता यांच्या गप्पा करत होते.
३. सांस्कृतिक मार्क्सवाद, अनेक पुरोगाम्यांच्या ‘पवार’करी वार्या आणि संतांची जातवार मांडणी
वारकरी संप्रदायाचा मूळ उद्देश हा ‘विठ्ठल भेटी’ची आस आणि ‘मोक्ष’ किंवा ‘सायुज्यता’ (देवाशी एकरूप होऊन मुक्ती मिळवणे) प्राप्त करणे, हाच आहे. नामस्मरण, कीर्तन आणि वारी ही साधने चित्तशुद्धीसाठी आहेत. ती पुरोगामित्व आणि सामाजिक समता यांचे राजकीय घोषणापत्र मांडण्यासाठी नाही. एखाद्या संस्थेत वा संप्रदायात घुसून ताबा मिळवणे आणि ती नष्ट करणे, हे सांस्कृतिक मार्क्सवादाचे लिखित ध्येय आहे. त्याचे राजकीय लाभ ओळखून गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पुरोगामी, ‘पवार’करी वार्या करू लागले. प्रारंभी ‘ग्यानबा तुकाराम’ याला पर्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी आरंभला होता. संतांची जातवार विभागणी या लोकांनीच केली. त्यामुळे भजन, कीर्तन यांत संतश्रेष्ठ ज्ञानदेव आणि संत एकनाथ नकोसे होऊ लागले; पण त्याला फारसा पाठिंबा मिळाला नाही. मग जगद्गुरु संत तुकाराम यांच्या खुनाचे तर्कट लढवण्यात आले. ‘सदेह स्वर्गा’त जाणे तर्काला पटत नसल्याने त्यांचा खूनच झाला’, असा तर्कट मांडण्यात आले. श्रद्धेच्या प्रत्येक मुळावर घाव घालतांना, त्याची जातवार मांडणी करतांना तोंडी समता आणि समानता यांच्या गोष्टी कायम ठेवल्या.
४. वारकरी संप्रदायाला धोका आत घुसलेल्या पुरोगामी अन् ‘पवार’करी यांचा !
मुळात वैयक्तिक सुधारणेवर भर असलेला वारकरी संप्रदाय आणि संत हे धार्मिकच आहेत. त्या अर्थाने ते प्रतिगामीही आहेत. त्यांना समतेच्या चळवळीचे पाईक करण्याचा कुणी प्रयत्न करू नये. ते वारकरी संप्रदायाच्या मूळ गाभ्याशी जुळेनासे झाले, तशी ‘भक्ती चळवळ’ नावाची नवी वळवळ विचारवंतांनी चालू केली. मग प्राचीन काळापासून असलेली आणि वारकरी संप्रदायाचा मूलाधार असलेली भक्तीसूत्रे, जी अनेक ऋषिमुनींनी लिहिली त्याचे काय ? याचे उत्तर कुणीही देत नाही.
वारकरी संप्रदायाला धोका प्रतिगामी आणि धार्मिक यांचा नाही, तर आत घुसलेल्या पुरोगामी अन् ‘पवार’करी यांचा आहे. त्यांची घुसखोरी वेळीच रोखली नाही, तर विठ्ठलाच्या भक्तीऐवजी हे समतेचे अन् समानतेचे खूळ माजेल. समृद्ध परंपरा असलेला वारकरी संप्रदाय मूळ वारीच्या वाटेवरून भरकटेल. वारकर्यांची पाऊले पंढरीच्या वाटेनेच जायला हवीत, बारामतीच्या वाटेने नव्हे !
– श्री. प्रसन्न बर्वे, पणजी, गोवा.
(साभार : ‘प्रसन्नवदने’ ब्लॉगवरून)
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?