महाराष्ट्रात १ मे पासून परवानाधारक रिक्शा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य ! 

  • परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा अभिनंदनीय निर्णय !

  • मराठी लिहिता-वाचता येत नसल्यास परवाना रहित होणार !

मुंबई – येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच १ मेपासून परवानाधारक रिक्शा आणि टॅक्सी चालक यांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांद्वारे याविषयी परवाना पडताळणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या वेळी संबंधित चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येते का ?, याची पडताळणी केली जाईल. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रहित करण्यात येतील, अशी चेतावणी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

ते म्हणाले, ‘‘मोटार परिवहन विभागाद्वारे रिक्शा किंवा टॅक्सी चालकांना परवाना देतांना स्थानिक भाषेचे, म्हणजेच मराठी भाषेचे ज्ञान असणे हा नियम आधीपासूनच लागू आहे. ज्या प्रदेशात आपण रहातो, त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणे जितके आवश्यक आहे, तितकेच अन्य राज्यांत व्यवसाय करतांना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणेही महत्त्वाचे आहे. म्हणूनच १ मेपासून सर्व परवानाधारक रिक्शा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता अन् वाचता येणे बंधनकारक राहील. नियमांचे पालन न करणार्‍या चालकांचे परवाने रहित करण्यात येतील. नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणार्‍या परिवहन अधिकार्‍यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल.’’

चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करत असल्याच्या अनेक तक्रारी !

‘मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही, तसेच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत’, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.